कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाकडे बुधवारी कोविशिल्ड लसीचे चार हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी नागरिकांना आज, गुरुवारी लसीकरण करण्यात येणार आहे.
४५ वर्षांवरील ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेला आहे व दुसऱ्या डोससाठी पात्र होऊन ज्यांचे दिवस उलटून गेलेले आहेत अशांना प्राधान्य क्रमानुसार त्यांना केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत लसीकरणास बोलाविण्यात येईल व त्यांचे कोविशिल्डच्या दुस-या डोसचे लसीकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज, गुरुवारपासून १८ ते ४४ या वयोगटांसाठीचे कोव्हॅक्सिन व कोविशिल्डचे लसीकरण होणार नाही, त्यामुळे केंद्रावर कोणीही येऊ नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
९९५ नागरिकांचे लसीकरण-
शहरात बुधवारी नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालय येथे ९९५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले येथे १३३, पंचगंगा येथे ८८, पंचगंगा येथे १९७, महाडिक माळ येथे १९०, मोरे मानेनगर येथे १८९ व सीपीआर हॉस्पिटल येथे १९८ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आजअखेर एक लाख १२ हजार ४२७ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ३५ हजार ६०७ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले.