कसबा बावड्यातील शुगरमिल, कसबा बावडा पूर्व बाजू, कसबा बावडा हनुमान तलाव, लक्ष्मीविलास पॅलेस हे चार प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर माधुरी लाड यांचा लाईन बाजार व स्वाती यवलुजे यांचा पोलीस लाईन प्रभाग सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे बावड्यावर महिलाराज असणार, हे स्पष्ट आहे.
शिवाजी पेठ झाली सर्वसाधारण -
शिवाजी पेठेत सहा प्रभागांचा समावेश असून त्यापैकी फिरंगाई, चंद्रेश्वर प्रभाग सर्वसाधारण झाले आहेत. पद्माराजे उद्यान, तटाकडील तालीम व नाथागोळे तालीम हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले, तर संभाजीनगर बसस्थानक हा एकमेव प्रभाग ओबीसी महिला झाला. त्यामुळे शिवाजी पेठेत यावेळी धूमधडाका असणार, हे स्पष्ट आहे.
मंगळवार पेठेवर महिलांची मक्तेदारी-
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर, मंगेशकरनगर, संभाजीनगर हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत, तर सध्दाळा गार्डन हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे मंगळवार पेठेतून संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, अभिषेक देवणे, संभाजी देवणे यांची पंचाईत झाली. त्यांना आपल्या पत्नीस निवडणुकीत उतरवावे लागणार आहे.
नाव सोडतीचे, आरक्षण मात्र थेट -
महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागाचे आरक्षण सोडतीद्वारे होईल, असे उपस्थितांना अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ६० प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, त्यासाठी सोडत काढली गेली नाही. केवळ २१ प्रभागांची सोडत झाली. त्यामुळे नाव सोडतीचे, आरक्षण मात्र थेटच झाले.