१. ‘फिरंगाई’त पुन्हा इंगवले विरुद्ध इंगवले -
शिवाजी पेठेतील फिरंगाई प्रभाग सर्वसाधारण झाला असून येथे काटाजोड लढत होणार आहे. या प्रभागात माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अजय इंगवले यांनी शड्डू ठोकला आहे. मागच्या निवडणुकीत या दोघांच्या पत्नी उभ्या होत्या. त्यामध्ये तेजस्विनी रविकिरण इंगवले यांनी बाजी मारली. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी रविकिरण यांना आता अजय यांनी आव्हान दिले आहे. अजय हे कॉंग्रेसकडून लढतील, तर रविकिरण शिवसेनेचे उमेदवार असतील. शिवाजी पेठेतील राजकीय गणिते बदलली असल्याने या प्रभागातील निवडणूक ‘बिग फाईट’ होणार असून संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे.
२. ‘पद्माराजे उद्यान’मध्ये राऊत-कोराणे-जरग-चव्हाण
पद्माराजे उद्यान प्रभागात धडाका असेल. अजित राऊत यांच्या पत्नी सुनीता राऊत, विक्रम जरग यांच्या पत्नी माधवी जरग या पारंपरिक प्रतिस्पर्धी तर असतीलच याशिवाय कोराणे यांच्या घरातील माजी नगरसेविका अर्चना उत्तम कोराणे किंवा मयूरी सम्राट कोराणे यांच्यापैकी एक उमेवार असणार आहे. पूजा अजिंक्य चव्हाण यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या वेळी आम्हाला शब्द दिला होता, असा दावा कोराणे यांनी केला आहे, तर अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती असे अजित राऊत यांचा दावा आहे. विशेष म्हणजे राऊत, कोराणे, चव्हाण हे राष्ट्रवादीकडून लढले होते.
३. ‘शिपुगडे तालीम नंदकुमार मोरे - संदीप देसाई, दिगंबर फराकटे लढणार -
मागच्या निवडणुकीत केवळ पाच मतांनी विजय मिळविलेल्या सरिता मोरे यांचे पती नंदकुमार माेरे निवडणूक लढणार असून त्यांना संदीप देसाई यांनी आव्हान दिले आहे. मोरे-देसाई यांच्यातील मागची निवडणूक कमालीची चुरशीची झाल्याने गाजली होती. आता या प्रभागात माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी उडी घेतल्याने ती अधिक रंगतदार होईल. कदाचित फराकटे - देसाई यांच्यात तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४. फरास विरुद्ध जाधव सामना ?
महालक्ष्मी मंदिर प्रभागातून आदिल फरास, संभाजी जाधव, आर.डी. पाटील, अजित ठाणेकर यांच्यात सामना रंगणार आहे. फरास राष्ट्रवादीकडून असतील, तर ठाणेकर भाजपकडून उभे राहणार आहेत. कॉंग्रेसने जर कदाचित तडजोड केलीच तर मात्र संभाजी जाधव यांना त्यांच्या पत्नी सुनंदा जाधव यांना मंगेशकरनगर प्रभागातून उमेदवारी दिली जाईल. तशी सोमवारी चर्चा सुरू होती.
५. नयना परमार, हसिना फरास पुन्हा रिंगणात
बिंदू चौक प्रभाग सर्वसाधारण महिला झाल्यामुळे तेथून ईश्वर परमार यांनी त्यांच्या वहिनी माजी नगरसेविका नयना परमार यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विराेधात माजी महापौर हसिना फरास उभ्या राहणार आहेत. याशिवाय सुनील सलगर, इंद्रजित सलगर, माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या घरातील महिला उमेदवार असेल. त्यामुळे येथेही निवडणुक रंगतदार होणार आहे.