कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यामुळे गुरुवारपासून शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्यात आल्या असून त्यामुळे गेले काही दिवस ठरावीक रस्त्यांवर दिसणाºया नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण राखण्यात यश मिळाले. एकीकडे शहरवासीयांची सोय करत असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागत आहे. या निर्णयामुळे शहरातील ‘लॉकडाऊन’अधिक कडक झाले.
कोल्हापुरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू झाली आहे तरीही शहरवासीयांची गैरसोय टाळण्याकरीता जिल्हा प्रशासनाने शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषध दुकाने, भाजी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच गैरफायदा नागरिक अधिक प्रमाणात घेत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे भाजी मंडईचे फेरनियोजन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेला दिले. त्यानुसार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी भाजी मंडईची पाहणी करून सर्व मंडई गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील प्रमुख रस्त्यावर जेथे भाजी विक्रेत्यांना पट्टे मरून देण्यात आले होते, त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना तेथून हटकले. शहराच्या विविध भागांत फिरून भाजी विका, एखाद्या गल्लीच्या कोपºयावर, चौकात सुमारे ४०-५० फुटांचे अंतर ठेऊन भाजी विकत बसा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे गेले काही दिवस शहरात होणारी गर्दी थांबली. प्रशासनाचा हेतू सफल झाल्यासारखे वाटत आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाला शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले शिवाय नागरिकांनाही आता दारात भाजी मिळणे सोयीचे झाले आहे.