कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात येत असलेल्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आज मंगळवारी किंवा उद्या बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडे त्या सादर केल्या जातील, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितली.प्रारुप मतदार यांद्यांवर ८१ प्रभागातून १८०० हरकती प्राप्त झाल्या असून ही संख्या मोठी आहे. त्यामुळे अंतिम मतदार याद्या तयार करताना त्या जास्तीत जास्त निर्दोष तसेच अचूक असतील यावर गांभीर्याने अधिकारी लक्ष देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत जागून तीन उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, शहर अभियंता, चार उपशहर अभियंता हे काम करत आहेत.
या सर्वांनी जवळपास काम संपविले आहे. आज, मंगळवारी त्याच्या अहवालासह या याद्या माझ्याकडे सुपूर्त केल्या जाणार आहेत. त्यानंतर मी स्वत: माझ्या अभिप्रायासह त्या राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.अंतिम मतदार याद्या दि. ३ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील असे आयोगाने आधी जाहीर केले होते. त्यामुळे आमचा अहवाल तत्पूर्वी आयोगाकडे देण्यात येईल. याद्या जाहीर करण्याबाबत आयोगाकडून मार्गदर्शन होईल, त्यानंतरच त्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या दि. ३ मार्च रोजीच प्रसिद्ध होतील की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही. कदाचित पुढील तारीख सुद्धा दिली जाईल, असे बलकवडे म्हणाल्या.प्रारुप मतदार याद्यावर हरकतींसाठी बीएलओ तसेच संबंधित अधिकारी यांनी जागेवर जाऊन भेटी दिल्या आहेत. प्रभागांचे नकाशे, घर नंबर, जीआयएस याची माहिती घेऊन सर्वच हरकतींना योग्य न्याय दिला आहे. ज्या हरकती योग्य होत्या, त्या दुरुस्त केल्या आहेत. अचूक याद्या तयार केल्या आहेत. याद्या प्रसिद्ध झाल्यावरच त्यातील चूक दुरुस्त झाल्याचे पाहायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.