कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहतुकीची जी कोंडी निर्माण झाली आहे, त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आक्षेप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या. यापुढे अतिक्रमण वाढले, पार्किंगच्या जागा बंदिस्त झाल्या, तर त्या त्या भागातील अभियंता यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.शहरातील रस्ते पार्किंग आणि अतिक्रमणात हरविले आहेत; त्यामुळे पहिल्यांदा बंदिस्त पार्किंग खुले करा, अतिक्रमणांवर कारवाई करा, अशी मागणी महेश जाधव यांनी केली. विकास आराखड्यातील पार्किंगच्या जागा विकसित कराव्यात, अशी सूचना राजसिंह शेळके यांनी केली. वाहतुकीची कोंडी रोखण्याकरिता शहरातील रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अशी सूचना उमा बनछोडे यांनी, तर फेरीवाला झोनची अंमलबजावणी करण्याची सूचना उमा इंगळे, विजय खाडे यांनी केली.
शहरात अवजड वाहनांना बंदी केली असली, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार कमलाकर भोपळे यांनी केली. प्रशासन करणार असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत नगरसेवकांनी हस्तक्षेप टाळावा, असा सल्ला रत्नेश शिरोळकर यांनी दिला.
मोठ्या गृहप्रकल्पातील पार्किं गला सोडलेल्या जागांची तपासणी करण्याची सूचना भूपाल शेटे यांनी केली. आराखडे तयार करण्याकरिता कन्सल्टंटवर ६० ते ७० लाख रुपये खर्च करणे सोईचे आहे का? याचा विचार प्रशासनाने करावा, असे अजित ठाणेकर यांनी सांगितले. ठाणेकर यांनी त्यांच्या प्रभागातील अनेक लॉजेसना पार्किंग नसल्याकडे लक्ष वेधले.यावेळी झालेल्या चर्चेत किरण नकाते, रूपाराणी निकम, मेहजबीन जमादार, शेखर कुसाळे, विजय सूर्यवंशी, निलोफर आजरेकर यांनी भाग घेतला. हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्या हत्तेबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे. यावेळी रेड्डी यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.५४ लाख वसूल करावेत : शेटेतीन वर्षांपूर्वी शहरातील पट्टे आखणे, रबरी स्पीडब्रेकर लावणे यांसारख्या कामांवर ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले. ज्यांनी हे काम केले, त्या विमलेश्वर संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. रबरी स्पीडब्रेकरचे काम निकृष्ट झाले. काम झाल्यानंतर स्पीडब्रेकर लगेच निखळून पडले आहेत. ही उधळपट्टी कशाला केली? असा सवालही शेटे यांनी केला.