भारत चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून मास्क न वापरणाऱ्या तसेच शारीरिक अंतर न ठेवणाऱ्या व्यक्ती व व्यापारी संस्थांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत असताना, दुसरीकडे मात्र महापालिका कार्यालयातील कर्मचारीच याबाबत उदासीन असल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. मास्क लावण्याची सक्ती आहे म्हणून कर्मचारी तोंडाला मास्क लावतात, पण नाक मात्र उघडेच ठेवत आहेत. तसेच शारीरिक अंतर ठेवण्याचेही भान त्यांना राहत नाही.
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून त्यातही कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या अधिक असल्याने महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारने केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता सात पथके नियुक्त केली आहेत. या पथकात मनपाचे कर्मचारी, केएमटीचे कर्मचारी तसेच पोलीस यांचा समावेश आहे. शहराच्या विविध चौकात थांबून, ज्या व्यक्ती मास्क वापरत नाहीत किंवा शारीरिक अंतर राखत नाहीत, अशांवर दंडात्मक कारवाई करताना दिसत आहेत. जानेवारीपासून ही मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे.
परंतु महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत या नियमांचे काटेकाेरपणे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. अनेक कार्यालयांतून फेरफटका मारला असता, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला, हनुवटीला मास्क आहे, परंतु नाक मात्र सताड उघडेच ठेवलेले असते. मास्क लावून तोंड व नाक झाकले पाहिजे, पण तसे कोणी करताना दिसले नाही.
साठ टक्के कर्मचाऱ्यांचे नाक उघडेच
प्रशासकीय इमारतीत जवळपास पंधरा ते वीस विभागांची कार्यालये आहेत. त्या ठिकाणचे किमान साठ टक्के कर्मचारी मास्क अर्धवट लावलेले असतात. सर्वच कार्यालये व तेथील टेबल-खुर्च्या या कमी जागेत असल्यामुळे शारीरिक अंतर राखणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. एकमेकांचा अगदी जवळून संपर्क येत आहे. बाहेरून येणारे नागरिकदेखील अगदी जवळून कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर मशीन्स आहेत, पण त्यांचा वापरही कमी लाेक करतात.
कारवाई होत नाही
मास्कचा चुकीच्या पध्दतीने वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत तरी कोणती कारवाई झालेली नाही. सक्ती असून देखील कर्मचारी बेफिकीर वागत आहेत. कारवाई रस्त्यावर आणि नियमांची पायमल्ली कार्यालयातच होत आहे.
अशी झाली दंडात्मक कारवाई -
१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात
- विनामास्क केसीस - १३ हजार ५७३ व्यक्तींवर
- विनामास्क दंड वसूल- १३ लाख ५७३
- शारीरिक अंतर केसीस - ५५९ व्यक्तींवर
- दंडाची रक्कम वसूल - तीन लाख ९३ हजार
कोट -
सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याबाबत यापूर्वीच सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही अधिकारी तर त्याचे काटेकाेर पालन करत आहोत. जर कोणी वापरत नसतील, तर पुन्हा एकदा सूचना दिल्या जातील.
- नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त