लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाने नगर परिषदेची देयके अदा करण्याबाबत स्थायी निर्देश निर्गमित केले असून, त्याची काटेकार अंमलबजावणी करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांना दिले.
निवेदनात, महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने राज्यातील नगर परिषदांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन ठेकेदारांची देयके नियमित व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर द्यावीत, असे आदेश दिले आहेत. मात्र, इचलकरंजी नगरपालिकेकडून शासनाच्या स्थायी निर्देशाला हरताळ फासण्याचे काम चालू आहे. पालिकेतील सत्ताधारी वशिलेबाजी करीत काही ठराविक ठेकेदारांची देयके अदा करीत आहेत. त्यामुळे स्थायी निर्देशाचा भंग होत असून, ज्यांची देयके प्रलंबित आहेत त्यांचे नुकसान होत आहे. या आदेशामध्ये स्थायी निर्देशाची अंमलबजावणी, देयकाच्या क्रमवारीनुसार दिली जातात किंवा नाही याची तपासणी आयुक्त तथा प्रादेशिक संचालक व जिल्हाधिकारी यांनी तपासणीवेळी करावी, तसेच परिपत्रकात नमूद केलेल्या तपशिलानुसार देयकांचे प्रदान होत असल्याची खात्री लेखापरीक्षण व लेखापाल यांनी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. तरीही इचलकरंजी नगरपालिकेकडून कोणत्याही आदेशाचे पालन केले जात नाही.