माणगाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाचे संकट गंभीर असताना माणगाव येथील आठवडा बाजार बुधवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची दवंडी व माहिती ग्रामपंचायतकडून कळवूनही विक्रेत्यांनी मुर्दाडपणे आठवडा बाजार भरवून ग्रामपंचायतीच्या लेखी आदेशाला हरताळ फासला.
माणगाव, ता. हातकणगंले येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. हा बाजार सायंकाळी भरविला जात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार सकाळीच गेले महिनाभर भरविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या नवीन नियमानुसार व येथील आठवडा बाजारात येणारे बाहेरील विक्रेते पाहता ग्रामपंचायतीने बुधवारचा बाजार न भरण्याचा आदेश जारी केला; पण बाहेरील विक्रेते व गावातील विक्रेते यांनी बाजारादिवशीच बाजारात ठाण मांडल्याने ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात तुंबळ गर्दी झाली. बाजार भरल्याची बातमी ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्यांना कळताच सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी बाजाराकडे धाव घेतली व येथून. विक्रेत्यांसह ग्राहकांना हुसकावून लावले. तोपर्यंत गावात बाजार भरल्याची बातमी कळताच ग्राहकही बाजारात तुंबळ गर्दी करू लागले; पण बाजार बंद केल्याची बातमी कळताच बऱ्याच ग्राहकांनी नेलेली पिशवी परत रिकामी आणावी लागली.