शिरोळ : नवीन घरामध्ये राहण्याच्या कारणावरुन अल्पवयीन मित्राच्या मदतीने कोयत्याने वार करुन मावशीचा खून केल्याची घटना टाकवडे (ता. शिरोळ) येथे घडली. अंजना रामचंद्र शिंदे (वय ५५, रा. रेणुका मंदिरजवळ टाकवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश गोपाळ गायकवाड याच्यासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास टाकवडे येथे घडली. याबाबतची तक्रार अमृता गणेश माने यांनी शिरोळ पोलिसांत दिली असून गणेश याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अंजना शिंदे या संशयित गणेश गायकवाड यांच्या मावशी आहेत. नवीन घरकुल बांधलेल्या घरामध्ये राहण्याच्या कारणावरुन गणेश व अंजना यांच्यात वारंवार वाद सुरु होता. याचा राग मनात धरुन गणेशने मित्राच्या मदतीने रेणुका मंदिरजवळ शिंदे यांच्या डोकीत, पाठीवर व तोंडावर कोयता व मागाच्या लाकडी माऱ्याने गंभीर वार केला. यामध्ये मोठा रक्तस्त्राव होऊन त्या जागीच ठार झाल्या. याप्रकरणी गणेश विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एन. सुळ करीत आहेत.
---------------------
लग्नाऐवजी गुन्हेगारीच्या बेडीत अडकला
गणेश हा उच्चशिक्षित असून इचलकरंजीत खासगी नोकरीस आहे. आसरानगरमध्ये आई,वडिलांसोबत राहत होता. राहते घर लहान असल्याने गणेशच्या लग्नास अडचण येत होती. त्यामुळे आई ,वडिलांसोबत तो टाकवडे येथे एक महिन्यापूर्वी राहण्यास आला होता. त्याने कोल्हापुरातील अनाथालयातील मुलगी लग्नासाठी पसंत केली होती. अनाथालय संस्थेनेही तयारी दर्शवली होती. मात्र, घर टापटीप व शौचालययुक्त असावे अशी अट घातली होती. त्यामुळे त्याने आजोळचे असलेल्या घराची दुरुस्ती करून घेतली होती. आजोळी मिरजेतील मावशी अंजनाही त्याच घरात असून घराच्या हक्कावरुन त्यांच्यात महिन्याभरापासून वाद सुरू होता. वाद व रागाच्या भरातून गणेशने मित्राच्या मदतीने मावशीचा खून करुन लग्नातील अडसर दूर केला. मात्र लग्नाच्या बेडीऐवजी गुन्हेगारीच्या बेडीत तो अडकला.
फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०६-मृत अंजना शिंदे, ०७-संशयित गणेश गायकवाड