कोल्हापूर : जिल्हयातील बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील दूहेरी खुनप्रकरणाचा आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक -एक एस. डी. जगमलानी यांनी वडिल व मुलास जन्मठेपेची, प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाईची शिक्षा गुरुवारी सुनावली. आनंदा माणकू पाटील (वय ६३ ) व त्याचा मुलगा मारुती पाटील ( ३२ , दोघे रा. बेलवळे खुर्द) अशी जन्मठेप झालेल्यांची नांव आहेत.यामध्ये रविंद्र आनंदा डोंगळे (वय २७) व प्रकाश विलास पाटील (२४) यांचा खून झाला होता. जन्मठेपेची शिक्षा झालेले आनंदा पाटील निवृत्त मुख्याध्यापक आहेत. हा खून राजकिय वादातून झाल्याचे कारण तपासात पुढे आले होते.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, बेलवळे खुर्दतील प्रमोद शिवाजी पाटील व संदीप केरबा पाटील यांना रणजित चंद्रकांत पाटील, विजय आनंदा पाटील व त्यांच्या घरातील अन्य लोकांनी ‘लय शहाणे झाले आहात, तुम्हाला मस्ती आहे. बघुन घेतो, थांब तुमची मस्ती उतरवतो’ अशी शिवीगाळ करुन ३० जून २०१२ ला दमदाटी केली होती. यावर दोन्ही गटांनी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भांडण तंटा न करण्याबाबत व शांतता पाळण्याबाबत समज दिली होती.गावातील भावेश्वरी देवालयाजवळ एक जुलै २०१२ ला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आनंदा पाटील हा बंदूक घेऊन तर त्याचा मुलगा मारुती हे रिव्हॉल्वर घेऊन आले. इतर आरोपी हे लोखंडी पाईप, हॉकि स्टिक व तलवार घेऊन आले होते.
यावेळी आनंदा पाटील व मारुती यांनी साक्षीदारांना मारहाण करुन जखमी केले तर रविंद्र डोंगळे व प्रकाश विलास कोतेकर यांचा खून केला. याबाबतची फिर्याद दिनकर श्रीपती कोतेकर (वय, ५१ रा. बेलवळे खुर्द ) यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली.याप्रकरणी आनंदा पाटील, मारुती पाटील यांच्यासह राजाराम माणकू पाटील, सागर राजाराम पाटील, संतोष राजाराम पाटील, विजय आनंदा पाटील, प्रकाश विश्वास पाटील व प्रदीप शिवाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होती. गुरुवारी या दुहेरी खून खटल्याचा निकाल लागला. अतिरिक्त सरकारी वकील अॅड. ए. एम.पिरजादे यांनी या खटल्यात एकूण २६ साक्षीदार तपासले.यात दिनकर कोतेकर, जखमी कृष्णात महादेव पाटील, अभिजीत दिनकर कोतेकर, राजेंद्र शामराव पाटील, प्रकाश चंद्रकांत डोंगळे, संदीप केरबा पाटील व आनंदा पाटीलला दुनाली शस्त्राचे काडतुसे विक्री करणारे दूकानदार जैनुद्दीन शिकलगार व मारुती पाटीलला रिव्हॉल्वरचे काडतूस विक्री करणारे दूकानदार अशोक तुकाराम पाटील, सिटी हॉस्पिटलचे डॉ. वीरेंद्रसिंह पवार यांची साक्ष महत्वाची ठरली. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी केला.यावेळी ए.एम.पिरजादे यांनी,न्यायालयात वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे व युक्तिवाद न्यायालयात केला. पिरजादे यांचा युक्तिवाद ग्राहय मानून जगमलानी यांनी आनंदा पाटील, मारुती पाटील या दोघांना भारतीय दंडविधान संहिता कलम ३०२ खाली दोषी ठरवून जन्मठेपेची व प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाईची शिक्षा सुनावली. ही नुकसानभरपाईची रक्कम मयताच्या वारसांना देण्याचे आदेश दिले.सरकारपक्षातर्फे पैरवी अधिकारी अर्चना कांबळे, मिनाक्षी शिंदे, अॅड. सतीश कुंभार, अॅड. कादंबरी मोरे, अॅड. सुविधा माने तसेच सहाय्यक फौजदार दत्तात्रय मासाळ,हेड कॉन्स्टेबल तुकाराम पाटील यांनी या कामी मदत केली.निकालाबाबत समाधान...मृत रविंद्र डोंगळे यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी आहे तर प्रकाश पाटीलच्या पश्चात आई, वडिल आहेत. गुरुवारी दोन्ही कुटूंबातील नातेवाईक जिल्हा न्यायालयात आले होते.त्यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केले.
या खटल्यातील आरोपी प्रकाश विश्वास पाटील याला भा.द.वि.स.कलम ३२४ खाली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. परंतु, प्रकाश हा शिक्षण घेत असल्याने त्याला तीन वर्षाचा चांगली वतुर्णक ठेवण्याच्या बॉण्डवर सोडण्यात आले, अशी शिक्षा सुनावण्यात आली.-अॅड.ए.एम.पिरजादे,अतिरिक्त सरकारी वकील, कोल्हापूर.