बोरवडे -घरगुती कारणाने वाद झाल्याने लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाचा विळ्याने खुन केल्याची घटना बिद्री (ता.कागल) येथे मंगळवारी उघडकीस आली. ही घटना सोमवार दि.१७ रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मारुती आनंदा बारड (मुळ गाव बारडवाडी ता.राधानगरी वय ३८) असे खुन झालेल्या भावाचे नाव आहे. घटनास्थळी मुरगूड पोलीसांनी भेट देवून पंचनामा केला. आरोपी मोहन आनंदा बारड याला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत मुरगूड पोलीस ठाणे व घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, बारडवाडी येथील आनंदा बारड यांचा बिद्री येथे घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय होता.त्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून ते बिद्री येथे भाड्याच्या घरात राहत होते. मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांची दोन्ही मुले ही मोलमजुरीसाठी इतरत्र जात होती. काल आई - वडील बाहेर गेले असता सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये घरगुती कारणाने कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मोहन याने मोठा भाऊ मारुती याच्या छातीवर डाव्या बाजूस विळ्याने (खुरपे) जोरदार वार केला. यामध्ये मारुतीचा जागीच मृत्यू झाला. मारुतीच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.
पोलीस पाटील रमेश ढवण यांनी मुरगूड पोलीसांत फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव , बिट अंमलदार महेश माळवदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे अधिक तपास करीत आहेत.
दोघेही व्यसनाच्या आहारी
मारुती व मोहन हे दोघेही व्यसनाच्या आहारी गेले होते, यातूनच त्यांच्या मध्ये सतत वाद होत असे. दोघांनीही दारु प्याल्यानेच ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. खुन केल्यानंतर मोहन अनेकांना मारुती खुरप्यावर पडून मृत झाल्याचे सांगण्याचा बनाव करत होता.