कोल्हापूर : दारूच्या नशेत मोबाइलवरून झालेल्या वादातून फिरस्ता मजूर विनायक विशाल लोंढे (वय ३२, रा. सदर बाजार, कोल्हापूर) याचा डोक्यात सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्या मारून मित्रानेच खून केला. हल्लेखोर समीर युनूस मणेर (वय ३२, मूळ रा. कदमवाडी, सध्या रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाजवळ गिरीश बारनजीक घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे याच्या आई-वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले असून, तो शहरात भटकून मिळेल ते मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याचा भाऊ नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहतो. सोमवारी रात्री तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पादचारी उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका सोडा वॉटरच्या गाडीजवळ मित्र समीर मणेर याच्यासोबत मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी दोघांमध्ये मोबाइलवरून वाद झाला. याच वादातून दोघांमध्ये झटापट झाली. मणेर याने जवळ असलेल्या सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्या डोक्यात मारल्याने लोंढे खाली कोसळला. मारहाणीचा प्रकार पाहून धावत आलेला रिक्षाचालक जावेद अजीज मणेर (रा. कदमवाडी) याने रुग्णवाहिकेतून लोंढे याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती.घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. तसेच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने हल्लेखोर मणेर याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झालेल्या वादातून लोंढे याचा खून झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर मणेर याच्यासोबत अन्य काही साथीदार होते काय, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी काचांचा खचघटनास्थळी सोड्याच्या आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. यातील काही बाटल्या फुटल्या होत्या. दोघांनी एकमेकांच्या दिशेने बाटल्या भिरकावल्यामुळे काही बाटल्या रस्त्यावरही गेल्या होत्या. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत झालेल्या मारामारीत काचांचा खच पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दारुच्या नशेत मोबाइलवरून वाद, कोल्हापुरात फिरस्त्या मजुराचा खून; हल्लेखोर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:03 PM