कागल : येथील गणेशनगर घरकुल वसाहतीमधील एकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. खुनानंतर आरोपी स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाला. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्यानंतर पोलीसही हादरले. शहरात तिहेरी खुनाचा प्रकार प्रथमच घडल्याने खळबळ उडाली आहे.
प्रकाश बाळू माळी ( वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तर, गायत्री प्रकाश माळी (३०) मुलगी आदिती (१६) मुलगा कृष्णात (१२) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. आराेपी प्रकाशने हे खून मंगळवारी वेगवेगळ्या वेळी केले. दुपारी दोन वाजता त्याने पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिचा गळा आवळला. तिचा मृतदेह किचनमध्ये ठेवून घरी बसून राहिला. सायंकाळी पाच वाजता मुलगा शाळेतून आला. त्याने आईचा मृतदेह बघताच आरोपीने मुलाचाही दोरीने गळा आवळला. रात्री आठ वाजता मुलगी आदिती घरी आली. तिचाही गळा आवळला तसेच ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागताच तिच्या डोक्यात वरवंटाही घातला.
त्यानंतर तो दोन तासाने सायकलवरून पोलीस ठाण्यात गेला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली.
वर्षभरापूर्वीच नवीन घरात
आरोपीने होमगार्ड म्हणूनही काम केले होते. हे कुटुंब कोष्टी गल्लीत राहावयास होते. नवीन घरकुल प्रकल्पात तापी इमारतीत त्यांना सदनिका मिळाल्यानंतर ते गेली वर्षभर राहावयास आले आहेत. आरोपी राजकीय व सामाजिक उपक्रमांतही हिरिरीने भाग घेत असे.
मुलांना कोण बघणार म्हणून हत्या
आरोपी प्रकाशचे पत्नीशी वारंवार भांडण होत होते. काही दिवस ती माहेरीही गेली होती. चारित्र्याच्या संशयावरून मंगळवारी दुपारीही भांडण झाले होते. मुलगा कृष्णात पायाने अपंग आहे. पत्नीला ठार मारल्यानंतर आता मुलांना कोण बघणार म्हणून आपण त्यांना मारले, असे पोलिसांना तो सांगत होता.