इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. सुनीलकुमार भगवानदास रावत (वय २२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन संशयितांसह सातजणांना अटक केली.पुष्पराज रामसिंह गाडे (२१), संतोषकुमार जोगेश्वर सिंह (१९), शिवेंद्र रामकुशन सिंह (१९) व चार अल्पवयीन (सर्व रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुनीलकुमार याचे पुष्पराज याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून त्याने साथीदारांच्या मदतीने काटा काढण्याचे नियोजन केले. त्यानुसार शनिवारी (दि. २) रात्री उशिरा पुष्पराज याने गावी जाण्याचे कारण सांगून सुनीलकुमार याला बोलावून नेले. तारदाळ हद्दीतील रेल्वे रुळाजवळ सर्वांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर पुष्पराज याने साथीदारांच्या मदतीने सुनीलकुमार याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रूळावर नेऊन ठेवला. त्यावरून रेल्वे गेल्यामुळे त्याचे दोन भाग झाले होते.दरम्यान, रविवारी (दि. ३) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळावर मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता हा मृतदेह सुनीलकुमार याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तो राहात असलेल्या परिसरात चौकशी केली असता त्याचा पुष्पराज याच्यासोबत वाद झाल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी पुष्पराजचा शोध घेतला. तो साथीदारांसह जयसिंगपूर रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत सर्वांना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या २४ तासांत या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
सातपैकी चार अल्पवयीनया घटनेत ऐन तारुण्यात मृत्युमुखी पडलेल्या सुनीलकुमार याच्यासह मारेकरी असलेले सातजण मध्य प्रदेश येथून कामासाठी म्हणून इचलकरंजीत आले आहेत. खून करणाऱ्यात सातपैकी चारजण १६ ते १७ वयोगटातील आहेत. मिसरूड फुटले नाही, अशा वयात त्यांनी खुनासारखा गंभीर गुन्हा केल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली होती.दोन पथकांमार्फत तपासरेल्वे रुळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केली होती. पथकाने परिसरातील कारखान्यांमध्ये चौकशी करत पहिल्यांदा मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तो राहात असलेल्या परिसरात तपास करत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासह संशयितांना अटक केली.