कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी रंकाळा चौपाटीवर आलेल्या सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात सहा ते सात जणांनी कोयते आणि एडक्याने २० ते २५ वार करून अजय दगडू शिंदे ऊर्फ रावण (वय ३०, रा. यादवनगर) याचा निर्घृण खून केला. या घटनेत आकाश सिद्धू माळी (वय १९, रा. यादवनगर) हा किरकोळ जखमी झाला. गुरुवारी (दि. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास रंकाळा चौपाटीवर टॉवरजवळ खुनाची थरारक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली.यादवनगरातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये वाद धुमसत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाश माळी याच्या घरावर विरोधी टोळीतील काही तरुणांनी दगडफेक केली होती. त्यानंतर दोन गटांत वाद झाला. अक्षय माळी, रोहित शिंदे यांनी गुरुवारी दुपारी फोन करून वाद मिटवण्यासाठी अजय शिंदे, आकाश माळी यांना रंकाळा चौपाटीवर बोलवले. हल्लेखोर आधीच रंकाळा चौपाटीवर येऊन थांबले होते.सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अजय शिंदे हा अन्य तिघांसह रंकाळा टॉवरजवळ पोहोचला. चर्चा होऊन वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला. त्यावेळी संशयित रोहित शिंदे याच्यासह सहा ते सात जणांनी अजय शिंदे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. चेहऱ्यावर आणि डोक्यात वर्मी घाव लागल्याने अजय जागेवरच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या पाठीतही सपासप वार केले. तीन ते चार मिनिटे हा थरार सुरू होता. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
भरदिवसा रंकाळा चौपाटीवर झालेल्या खुनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. काही क्षणात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. बघ्यांची गर्दी पांगवून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. सीपीआरमध्ये लक्ष्मीपुरीचे निरीक्षक दिलीप पवार, शाहूपुरीचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी मृताच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचे काम केले.नातेवाइकांनी गोंधळ घातल्यामुळे परिसरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी साक्षीदारांकडून घटनेची माहिती घेऊन संशयित हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके तैनात केली. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सहाजण ताब्यातअजय शिंदे खून प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना ताब्यात घेतले. रोहित शिंदे, राहुल शिंदे, निलेश बाबर, राज जगताप, अर्जुन शिंदे अशी संशयितंची नावे आहेत.बंदोबस्त तैनातखुनाच्या घटनेनंतर यादवनगरातील महिला आणि तरुणांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीपीआरच्या अपघात विभागासमोर पोलिसांसह शीघ्र कृती दलाची एक तुकडी तैनात केली होती. यादवनगरातही राजारामपुरी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.
दिवसात तीन खूनराज्याच्या तुलनेत शांत समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरसाठी गुरुवार मर्डर डे ठरला. सकाळी हुतात्मा पार्क येथील अनोळखी पुरुषाच्या खुनाची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणीचा नातेवाइकांच्या मारहाणीत मृत्यू झाला. तोपर्यंत सायंकाळी रंकाळा चौपाटीवर गुन्हेगाराचा निर्घृण खून झाल्याने शहर हादरले. या घटनांमुळे शहरातील चारही पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी आणि पोलिस गुरुवारी दिवसभर व्यस्त राहिले. यंत्रणेवर निवडणूक प्रचाराचा ताण असताना गुन्हेगारी वाढल्याने चिंतेत भरच पडली.