कोल्हापूर : खासगी सावकारीचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी संशयीत संतोष निवृत्ती परिट (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याने पाचगावमधील वृध्देचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वृध्देचे दागिणे त्याने खासगी फायनान्स कंपनीत ठेवून मिळालेल्या पैशातून त्याने हातउसने घेतलेले अनेकांचे पैसे भागविल्याचेही निष्पन्न झाले.दरम्यान, वृध्देचे तुकडे केल्याबाबत संशयीताने अद्याप मौन पाळले असून अवयवापैकी धड शोधण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे.सोन्याच्या दागिण्याच्या हव्यासापोटी पाचगाव येथील शांताबाई शामराव आगळे (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) हिचा शुक्रवारी (दि. ५) क्रुरपणे खून केला. त्याचे तुकडे राजाराम तलावनजीक कृषी महाविद्यालयाच्या माळावर मंगळवारी (दि. ९) मिळाले. दागिण्यांसाठी खून केल्याची कबूली परिट याने पोलिसांकडे दिली.खूनानंतर दुसरे दिवशीच त्याने ते दागिणे फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे उचलले. तो रहात असलेल्या अपार्टमेंटमधील काहीजणाकडून हात उसने घेतलेले सर्वांचे पैसे त्याने भागवले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी केली.
दरम्यान, त्याने खासगी सावकाराकडूनही मोठे कर्जे उचलले होते. ते परतफेडीसाठी सावकाराने तगादा लावला, त्यामुळे कर्जाच्या परतफेडीसाठी वृध्देचा खून करण्याचा तिचे दागिणे लंपास करण्याचा मार्ग अवलंबल्याचे तपासात पुढे आले, त्यानुसार पोलिस सावकाराच्या शोधात आहेत.