कोल्हापूर : खासगी सावकारीचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी संशयित संतोष निवृत्ती परीट (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याने पाचगावमधील वृध्देचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वृध्देचे दागिने त्याने खासगी फायनान्स कंपनीत ठेवून मिळालेल्या पैशातून त्याने हातउसने घेतलेले अनेकांचे पैसे भागविल्याचेही निष्पन्न झाले.
दरम्यान, वृध्देचे तुकडे केल्याबाबत संशयिताने अद्याप मौन पाळले असून अवयवांपैकी धड शोधण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी पाचगाव येथील शांताबाई श्यामराव आगळे (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) हिचा शुक्रवारी (दि. ५) क्रूरपणे खून केला. त्याचे तुकडे राजाराम तलावनजीक कृषी महाविद्यालयाच्या माळावर मंगळवारी (दि. ९) मिळाले. दागिन्यांसाठी खून केल्याची कबुली परीट याने पोलिसांकडे दिली.
खुनानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने ते दागिने फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे उचलले. तो राहत असलेल्या अपार्टमेंटमधील काही जणांकडून हातउसने घेतलेले सर्वांचे पैसे त्याने भागवले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली. दरम्यान, त्याने खासगी सावकाराकडूनही मोठे कर्ज उचलले होते. ते परतफेडीसाठी सावकाराने तगादा लावला, त्यामुळे कर्जाच्या परतफेडीसाठी वृध्देचा खून करण्याचा व तिचे दागिने लंपास करण्याचा मार्ग अवलंबल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पोलीस सावकाराच्या शोधात आहेत.
आदल्या रात्री जेवण, दुसऱ्या दिवशी खून
संशयित आरोपी परीट हा खुनाच्या आदल्या दिवशी रात्री पाचगाव येथे या वृध्देच्या घरी गेला होता, वृध्देने त्याला तितक्याच मायेने घरी जेऊ घातले. तोही भरपूर जेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा आला. तिला घेऊन गेला व त्याने तिचा क्रूरपणे खून केल्याचे सांगितले.
पोलीसही अद्याप चक्रावलेलेच
खुनाची कबुली संशयिताने दिली. पण मृतदेहाचे तुकडे कसे केले, कोठे केले, कोणते हत्यार वापरले, तिचे धड कोठे आहे, खुनात आणखी कोणाचा सहभाग आहे? अशा अनेक प्रश्नांची उकल अद्याप न झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत. संशयित माहिती लपवत असल्याची शंका पोलिसांना येत आहे.