कोल्हापूर : घरातून बोलवून घेऊन मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञातांनी हाकेच्या अंतरावर तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना आंबील कट्टी कागल येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे मृताचे नाव आहे. खून कोणी केला, कोणत्या कारणातून केला याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. खून प्रकरणामुळे कागलमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सूरजचे मित्र, त्याचे पूर्व वैमन्स्य कोणाशी होते याबाबत माहिती घेवून मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीसांनी सांगितले, सूरज घाटगे हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कारखान्यात नोकरी करीत होता. त्याचे वडील कागल नगरपरिषदेमध्ये नोकरी करतात. आई घरकाम करते. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले असून एक महिन्याची मुलगी आहे. शनिवारी तो घरी असताना सायंकाळी सहाच्या सुमारास मोबाइ्लवर फोन आल्याने तो जाऊन येतो असे सांगुन घराबाहेर पडला.
गल्लीमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा तरुणांनी त्याला मोटारीवर बसवून काही अंतर पुढे नेले. रस्त्याकडेला थांबून त्यांचेत वादावादी झाली. यावेळी एकाने त्याला चाकुने भोसकले. तो मोठ्याने ओरडून जमिनीवर कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिलेनंतर त्यांनी धाव घेतली. लोक आलेचे पाहून तिघे मारेकरी धूम स्टाईलने पळून गेले.
घरापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने नातेवाईकांनी धाव घेत त्याला कागल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याची प्रकृत्ती गंभीर असलेचे पाहून येथील डॉक्टरांनी सीपीआरला नेण्यास सांगितले.
रुग्णवाहीकेतून कोल्हापूरला येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती कागल पोलीसांना समजताच त्यांनी सीपीआरकडे धाव घेतली. शवगृहामध्ये त्याचे मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्या आई-वडीलांसह पत्नीचा अक्रोश हदय पिळवटू टाकणारा होता.वडील स्तब्ध सूरजच्या पोटात गंभीर वार झाल्याने रक्तस्त्राव झाला होता. हातातोंडाला आलेल्या मुलाला कोणी मारले, कशाबद्दल मारले हे काहीच माहित नव्हते. एकुलत्या मुलाचा मृत्यू झालेचे समजताच ते काहीवेळ स्तब्धच उभे राहिले. त्यांना काहीच समजत नव्हते. भांबावून गेलेल्या वडीलांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे भरुन आले.कष्टाची सवयसूरजची स्वत:ची मोटार आहे. भाडे आले की बाहेरगावी जात असे. इतरवेळी तो कारखान्यात काम करीत होता. त्याला कष्टाची सवय होती. त्याचा खून आर्थिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला हे स्षष्ट झालेले नाही.