कोल्हापूर /वारणानगर : कुशीरे (ता. पन्हाळा) गावच्या हद्दीत केर्लेहून जोतिबाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी असलेल्या शेतामध्ये खून करून पुरण्यात आलेली बालिका सातारा जिल्ह्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आठ दिवसांपूर्वी याठिकाणी संशयित कार तब्बल चार तास थांबून होती. ती सातारा पासिंगची असल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलीस आठ दिवसांपूर्वी जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांची यात्राकर नाक्यावरील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून माहिती घेत आहेत. कुशिरे येथून जोतिबा येथील पांजरपोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर शांताबाई तोडकर यांच्या शेतामध्ये सोमवारी पाच वर्षांच्या अज्ञात बालिकेचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मृतदेह पूर्णत: सडलेला असल्याने तिची ओळख पटविणे शक्य नव्हते. त्यासाठी पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी मृतदेहाचे काही अंश पुणे येथे पाठविले आहेत. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी परिसराची झाडाझडती घेतली; परंतु संशयास्पद काहीच मिळून आले नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कोडोली पोलिसांनी आज, मंगळवारी पुन्हा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच पुण्यातील फॉरेन्सीक सायन्सच्या सहाजणांच्या पथकाची या खुनाच्या शोधासाठी नियुक्ती केली आहे. यावेळी स्थानिक नागरिक व गुराख्यांकडे गोपनीय चौकशी केली असता ११ नोव्हेंबरला तेथे सातारा पासिंगची चारचाकी गाडी तीन-चार तास संशयितरीत्या थांबून असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासयंत्रणा राबविली असून, कोल्हापुरातील ती बालिका नसल्याचे स्पष्ट होत झाल्याने परजिल्ह्णांत तपासाची सूत्रे केंद्रित केली. कोडोली पोलिसांनी सातारा जिल्ह्णातील बेपत्ता बालिकांची माहिती मागविली आहे. त्याचबरोबर इतर सांगली, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, गोवा येथील पोलिसांनाही माहिती कळविली आहे. (प्रतिनिधी) नरबळी नव्हे..! पुणे येथील न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बालिकेचा मृतदेह, कपडे व चादर यांची पाहणी केली. ज्या ठिकाणी बालिकेला पुरण्यात आले होते, त्या जागेवरील माती, बालिकेचे केस व इतर साहित्य ताब्यात घेतले. घटनास्थळावरील दृश्यावरून नरबळीचा प्रकार नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
खून झालेली बालिका साताऱ्यातील?
By admin | Published: November 19, 2014 12:14 AM