अनिल पाटील, मुरगूड: सोशल मिडीयावर जाहिरात करून आपल्या व्यवसायाची प्रसिध्दी मिळवलेल्या एका बोगस डॉक्टर ने रुग्ण महिलांशी अश्लिल चाळे केल्याच्या सुमारे सत्तर ते ऐंशी क्लिप व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. शनिवारी एकाच दिवशी याबध्दल मुरगूडमधील सुमारे चारशे लोकांना निनावी पत्रे आली व त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. या क्लिप त्या डॉक्टरने स्वत:च तयार केल्या असल्याचे दिसते. त्यातील बहुतांशी महिलाही स्थानिकच असल्याने लोकांत संतापाची लाट उसळली.
हा डॉक्टर गेली अनेक दिवस सोशल मिडीयावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करत होता. त्याच्या व्हायरल क्लिप पाहून राज्य परराज्यातून लोक उपचारासाठी येत होते. त्याचाच फायदा घेवून त्यांने या महिलांसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे चित्रीकरण स्वत:च्या मोबाईलमध्येच केले. त्यामध्ये महिलांसह तरुण मुलींचाही समावेश आहे. कंबर दुखते अशी तक्रार करायला आलेल्या महिलेला हा डॉक्टर तुम्ही चुकीच्या पध्दतीने लैंगिक संबंध करत असल्याचे उत्तर देत असल्याचे संभाषण त्या क्लिपमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या क्लिप करून त्यांने त्या लॅपटॉपमध्ये घेतल्या होत्या. तो लॅपटॉप दुरुस्तीला गेल्यावर त्यातील क्लिप बाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे.
गेली काही दिवस त्या मुरगूड परिसरातील अनेकांच्या मोबाईलवर व पेन ड्राईव्ह वरून फिरत होत्या परंतू त्याबध्दल कुणी तक्रार केली नव्हती..परंतू शनिवारी त्यासंबंधी चारशेहून अधिक निनावी पत्रे आल्याने त्याला वाचा फुटली. कुणीतरी महिलांनी शहरातील अनेकांना एकाच वेळी पोस्टाद्वारे ही पत्र पाठवल्यामुळे दबक्या आवाजातील चर्चेला जाहीर स्वरूप आले. शहरातील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना व पत्रकारानाही या चित्रफिती असलेले पेन ड्राईव्ह पोस्टाने कुणीतरी पाठवून दिले. त्यामुळे या भोंदू डॉक्टरच्या कारनाम्याचे बिंग फुटले.
लांछनास्पद प्रकार
मुरगूड राजकीय दृष्ट्या संवेदनशील शहर आहे. येथे शहराने नेहमीच महिलांचा सन्मानच केला आहे. कधीच अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे बदनामीकारक चित्रफितीमुळे शहराची बदनामी झाल्याची भावना व्यक्त झाली. या भोंदू डॉक्टरने अश्लील चाळ्याचे चित्रण करून मुरगुडचे नाव बदनाम केले आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या आडून लांछनास्पद प्रकार करून वैद्यकीय क्षेत्राला कलंक लावल्याची प्रतिक्रिया उमटली.
पोलिसांत तक्रार नाही
अश्लील चाळ्याचे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत अप्रवृत्तीला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे. या डॉक्टरच्या अशा कृत्यास पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत या पत्रात व्यक्त केले आहे. अशीच पत्रे व पेनड्राईव्हही कोल्हापूरला पोलिस मुख्यालयांस पाठवण्यात आल्याचे समजते परंतू याबाबत मुरगूड पोलिसांत मात्र रात्री उशीरापर्यंत कुणाचीच तक्रार आलेली नसल्याने गुन्हा नोंद झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"