मुरगूड : माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत पर्यावरण बचाव व प्रदूषण टाळण्यासाठी मुरगूड शहरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा एकमुखी ठराव मुरगूड नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. मुरगूड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खेळीमेळीत झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. यावेळी सुधारित नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. मुरगूड-निपाणी मार्गावरील मुरगूडच्या प्रवेशद्वाराशेजारी हॉल मास्क दिवे व कमानी करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक जयसिंग भोसले यांनी केली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. वेदगंगा नदीशेजारील दत्त मंदिराजवळील स्मशानभूमीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नगरसेविका वर्षाराणी मेंडके यांनी केला, तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक नामदेवराव मेंडके यांनी केली. निपाणी- राधानगरी या नवीन होणाऱ्या रस्त्यावर कर्नाटकच्या धर्तीवर सुशोभिकरण करावे, अशी मागणी राहुल वंडकर यांनी केली.
चौकट
महालक्ष्मीनगरात घंटागाडीची घंटा बंद केल्याने पालिकेच्या कोणत्याच सूचना मिळत नसल्याच्या तेथील महिलांच्या तक्रारी आहेत. तसेच या उपनगरातील बगीचा सर्वांसाठी खुला पाहिजे, अशी मागणी नगरसेविका सुप्रिया भाट यांनी केली. सुधारित पाणी योजना सुरू होईपर्यंत ड्राय डे न पाळण्याचा निर्णय सभेत झाला. सुधारित पाणी योजना कधी पूर्ण होणार? शहरातील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी होणार? का? असा सवाल उपस्थित करीत याची माहिती सभागृहाला देण्याची मागणी नगरसेवक सुहास खराडे यांनी केली. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणे, तिमाही लेख्यांना मंजुरी देणे आदींसह सर्व विषय मंजूर करण्यात आले.