मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या मंगळवारी येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. उपविभागीय अधिकारी आर.आर. पाटील, सपोनि विकास बडवे यांनी नगर परिषदेमध्ये जाऊन मंगळवारी भरणार आठवडी बाजार रद्द करावा, तसेच काळे झेंडे लावण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली होती.
मंत्री मुश्रीफ यांनीही सर्वांना सोमय्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन दिल्याने सोमय्या दौऱ्याचा विरोध मावळला आहे; पण मुरगूडचा आठवडी बाजार मंगळवारी भरत असल्याने शहरात तोबा गर्दी होते. शिवाय निपाणी राधानगरी रस्त्यावर ही वाहतूक कोंडी होते. जनावर बाजारामध्ये ही गर्दी असते, त्यामुळे कोठे अडथळा निर्माण व्हायला नको म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आज पालिका प्रशासनाने आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मंगळवारी व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजारात येऊ नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.