कोल्हापूर : ‘गोकुळ’चे शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची केलेली नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ‘गोकुळ’ विरोधात केलेल्या आंदोलन व त्यामध्ये जिल्ह्यातील मंत्र्यांवर केलेल्या आरोपांची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन आंदोलनानंतर पाच तासातच त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यांना एखाद्या महामंडळावर संधी देण्यात येणार असल्याचेही समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीने दीड महिन्यापूर्वी मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश दुग्ध आयुक्त व विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी दिले. तसे पत्र ‘गोकुळ’ला काढण्यात आले, मात्र जाधव यांची थेट झालेली नियुक्ती ‘गोकुळ’च्या नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे जाधव यांना कामकाजात सहभागी करून न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गेली दीड महिने जाधव संचालक मंडळात जाण्यासाठी प्रयत्नशील हाेते. मात्र ‘गोकुळ’ प्रशासनाकडून त्यांंना प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर शुक्रवारी ‘गोकुळ’ दूध प्रकल्पावर शिवसैनिकांसोबत जाऊन शंखध्वनी केला. येथेही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलनाबाबतची सगळी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वीरेंद्र मंडलिक यांना संधी शक्य
‘गोकुळ’मध्ये दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त प्रतिनिधींची संचालक मंडळात वर्णी लागणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना संधी देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे जाधव यांना सत्तारूढ गटाचा विरोध होता, मात्र हिंदुत्ववादी व इतर मुद्दे नियुक्तीला जोडल्याने ते अडचणीत आले.