कोल्हापूर : आजी-माजी नगरसेवक, उद्योजक, कार्यकर्ता, अपक्ष यांच्यात रंगलेल्या प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्स्टेंशनमधील बहुरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर जाधव यांनी बाजी मारली. भाजपचे विजय जाधव, काँग्रेसचे अतुल पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप पोवार, अपक्ष व नगरसेवक राजू पसारे, अपक्ष जनार्दन कोरे, माधव सबनीस यांचा पराभव झाला.हा प्रभाग ‘सर्वसाधारण’ साठी खुला झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह अनेक दिग्गज या प्रभागातून लढले. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव हे यावेळी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते. त्यांचा हक्काचा तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने, ते या प्रभागातून लढले. त्यांनी प्रभाग क्रमांक ३७ मध्ये केलेल्या विकासकामांचा आरसा त्यांच्या पथ्यावर पडला. जाधव हे ११७८ मतांनी विजयी झाले. या विजयाने ते सलग दुसऱ्यांदा महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी निवडणुकीच्या रिंगणातील आजी-माजी नगरसेवकांना आव्हान दिले. चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नांत चांगली टक्कर देत ९८१ मते मिळविली. काँग्रेसचे अतुल पाटील हे ६८६ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. अपक्ष लढलेल्या राजू पसारे यांना अवघी १४७ मते मिळाली. महापालिकेत दोनवेळा प्रभागाचे नेतृत्व केलेले प्रदीप पोवार हे शिवसेनेच्या माध्यमातून लढले. त्यांना २९४ मते मिळाली. अपक्ष माधव सबनीस यांना ६९ आणि जनार्दन कोरे यांना १७ मते मिळाली. (प्रतिनिधी)प्रचारानंतर चित्र बदललेतवनाप्पा पाटणे हायस्कूल हा हक्काचा प्रभाग बदलून राजारामपुरी एक्स्टेंशनमधून मुरलीधर जाधव लढले. त्यांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्यापूर्वी येथील काही विकासकामे केली होती. हीच विकासकामे विजयासाठी त्यांच्या पथ्यावर पडली शिवाय प्रचाराची मुदत संपल्यानंतरच्या घडामोडींनी चित्र बदलल्याची चर्चा प्रभागात रंगली होती.
मुरलीधर जाधव यांची बाजी
By admin | Published: November 03, 2015 12:14 AM