कोल्हापूर : ‘वर्ल्ड टी-२०’ क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया या सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोघा पंटरांना शुक्रवारी सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये छापा टाकून अटक केली. अमित बाळासाहेब बुकशेट (वय ३०, रा. जावडेकर कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क), तेजू ऊर्फ बंटी मोहन महाडिक (३५, रा. मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर पांडुरंग जाधव यांच्यासह पाच ते सहा जणांचे आम्ही पंटर असून, त्यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. बेटिंगचे म्होरके जाधव यांच्यासह ठाकूर ऊर्फ प्रकाश बेला, शिवन (पूर्ण नाव माहीत नाही), रोहन परांडेकर, चेतन वरुटे, संतोष परमार, नितीन ओसवाल, आदींच्या मुसक्या आवळणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, आरोपींनी आॅस्ट्रेलियासाठी एक रुपयास ५० पैसे व पाकिस्तानसाठी एक रुपयासाठी ६० पैसे अशा दराप्रमाणे क्रिकेट सामन्यावर सुमारे एक लाख रुपयांचे बेटिंग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आज, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. वर्ल्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील क्रिकेट बेटिंगचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये वर्ल्ड टी-२० स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात बेटिंग घेत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित व अन्य सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने दुपारी चारच्या सुमारास छापा टाकला असता अमित बुकशेट व तेजू उर्फ बंटी महाडिक हे दोघेजण बेटिंग घेताना सापडले. त्यांच्याकडून टीव्ही, संगणक, मोबाईल व रोख रक्कम एक लाख रुपये जप्त केले. त्यांना पोलीस मुख्यालयात आणून चौकशी केली. सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मुरलीधर जाधव, ठाकूर उर्फ प्रकाश बेला, शिवन ( पूर्ण नाव माहीत नाही), रोहन परांडेकर, चेतन वरुटे, संतोष परमार, नितीन ओसवाल यांचे आपण पंटर असून त्यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली दिली. चौकशीमध्ये कोल्हापूर ते मुंबईपर्यंत क्रिकेट बेटिंगचे कनेक्शन असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या गुन्ह्णाची व्याप्ती वाढली असून तपास अधिकारी दिनकर मोहिते यांना या गुन्ह्णातील मुुख्य सूत्रधार स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह अन्य आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
मुरलीधर जाधवच्या दोघा पंटरना अटक
By admin | Published: March 26, 2016 12:23 AM