आयुब मुल्लाखोची: विविध प्रकारच्या सुमारे सव्वाशे दुर्मिळ वस्तूंचे जतन करीत इतिहास परंपरा संस्कृती सांगणारे वस्तूंचे संग्रहालय पाडळी (ता.हातकणंगले) येथे स्थापन केले आहे. अंबप हायस्कूलचे शिक्षक विनायक गुरव यांनी प्रचंड परिश्रमातून जिज्ञासूवृत्तीने नव्या पिढीला जुना काळ वस्तूंच्या रुपात कळावा यादृष्टीने या संग्रहालयाची निर्मिती केली आहे. नऊ वर्षापासून वस्तू संकलनाचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली आहे.ग्रामीण भागात अशी संग्रहालय निर्माण करणे आणि त्याचे स्वरूप वाढवीत ठेवणे हे नव्या पिढीला माहिती मिळण्याचे मोठे केंद्रच म्हणावे लागेल. नोकरी सांभाळत गुरव यांनी वस्तू जमविण्याचा छंद जोपासने सध्याच्या काळात समजोयोगी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचा वापर कमी होवून यंत्राचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या पिढीला आई वडील, आजोबा, पणजोबा यांच्या काळात किंबहुना त्याही पूर्वीच्या काळात जगण्याची पद्धत आणि साधने कशी याची परंपरा या संग्रहालयात अनुभवता येते. गुरव यांनी आपल्या घरासमोरील एका छोट्या खोलीत याची लक्ष्यवेधी सुरेख मांडणी केली आहे. नजर टाकताच ग्रामीण जीवनाचे चित्र उभा राहते.शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी दगडी पाटी, आजी बाईचा बटवा, सौंदर्य खुलवणारी आइना पेटी, तांब्याची पितळी भांडी, फिरके तांबे, चिमणी दिवा, दुर्बीण, लाकडी कटवट, रवी, मुसळ, शेवयाचा पाट, रेडिओ, कंदील, दहा किलो वजनाचा लोखंडी ट्रंक, ठोक्याचे घड्याळ, पानपुडे, लोखंडी भले मोठे कुलूप यांची कुतूहलाने पाहणी करावीच लागते अशी जपणूक आणि मांडणी केली आहे. दीडशे वर्षांपूर्वीचा दोन, चार, आठ आणेचा दस्त (स्टँप) हा लिखित ठेवा पाहता येतो. सव्वाशे वर्षापूर्वीची पंचाग, दीडशे वर्षापाठीमागची आर्थिक देवाण घेवाण नोंदीची डायरी सुस्थित असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या काळातील नाणी तसेच परकीय चलने आहेत. मलेशिया, थायलंड, सिंगापूर, नेपाळ आदी देशातील चलन पाहता येते.
Kolhapur: जुनं ते सोनं!, पाडळीत दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 5:44 PM