कोल्हापूर : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येण्याचे नक्की झाल्यामुळे आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे पालकमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्या पातळीवरही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील कुणाची वर्णी लागणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पालकमंत्रिपद कुणालाही मिळाले तरी आगामी पाच वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर मुश्रीफ-सतेज पाटील यांचाच प्रभाव राहणार, हे स्पष्टच आहे. काँग्रेसने अपवाद वगळता विधान परिषद सदस्यांना आतापर्यंत मंत्रीपदाची संधी दिलेली नाही, तसा कांही निकष पुढे आला तरच आमदार सतेज पाटील यांच्यापुढे अडचणी निर्माण होवू शकतात.
निवडणुकीच्या आधीच नव्हे तर निकालानंतरही दोन्ही काँग्रेसना सत्तेचा योग येईल, असे कुणी सहज म्हटले असते तरी त्यास लोकांनी वेड्यात काढले असते; परंतु राजकारणात काहीही घडू शकते, या उक्तीप्रमाणे भाजपचा वारू रोखण्यासाठी परस्पर राजकीय भूमिका असणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करीत आहेत. तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपदाची विभागणी होणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यास सत्तेची संधी मिळण्यात मर्यादा येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार मुश्रीफ यांचे मंत्रिपद नक्की मानले जाते. भाजप सरकारच्या काळात त्या सरकारने अनेक चौकशांचा ससेमिरा मागे लावला तरी मुश्रीफ हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेच. त्याशिवाय त्या निष्ठेचे त्यांनी अत्यंत खुबीने मार्केटिंगही केले. राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजातील हा प्रमुख नेता आहे. त्यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांची नक्की वर्णी लागू शकते.
काँग्रेसमध्ये मात्र एवढी सहज स्थिती नाही. कारण या पक्षाचे दक्षिण महाराष्ट्रात १० आमदार निवडून आले आहेत. त्यात सर्वाधिक चार आमदार कोल्हापुरातून निवडून आले आहेत. शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनीही यापूर्वी गृह, ग्रामविकास,अन्न व औषध प्रशासन यासारख्या खात्यांत राज्याने दखल घ्यावी असे काम करून दाखविले आहे.
काँग्रेसमध्ये त्यांचे राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांचाही दावा प्रबळ मानला जातो. आमदार पी. एन.पाटील हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत. गेली ३० वर्षे ते जय-पराजयाची तमा न बाळगता मतदार संघात पाय रोवून आहेत. पक्ष अडचणीत असताना त्यांनीही जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपदासाठी प्रयत्न आहेत. राज्यात काँग्रेसला किती मंत्रिपदे मिळतात यावरही जिल्ह्यात कुणा-कुणाला संधी मिळणार हे ठरणार आहे.शिवसेनेचे सरकार येणार असल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळावे असे प्रयत्न सुरू असले ही शक्यताही कमी वाटते. मागच्या सभागृहात शिवसेनेचे सहा आमदार होते, तरी त्या पक्षाने एकही मंत्रिपद दिले नव्हते. या निवडणुकीत तर एकटे आबिटकर हेच निवडून आले आहेत. शिवाय शिवसेनेच्या वाट्याला कमी मंत्रिपदे येणार असल्याने पक्षनेतृत्व कितपत कोल्हापूरचा विचार करते याबद्दल साशंकता आहे.काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेचदक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरला चार, सांगली व पुण्यात प्रत्येकी दोन आणि सातारा व सोलापूर जिल्ह्यांत प्रत्येकी एक असे आमदार निवडून आले आहेत. आमदार कमी असले तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम असे मातब्बर नेते निवडून आले आहेत. सरासरी चार आमदारांमागे एक मंत्रिपद द्यायचे ठरले तरी दक्षिण महाराष्ट्राला दोन किंवा तीनच मंत्रिपदे मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच आहे.---------------------दोघेही पालकमंत्रीच...दोन्ही काँग्रेसचे सरकार असताना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे होते. दिवंगत पतंगराव कदम व हर्षवर्धन पाटील यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळीही हे पद मुश्रीफ यांना हवे होते; परंतु स्थानिक राजकारणातून त्यांना विरोध झाला. पालकमंत्री असल्यावर जिल्ह्याची सारी यंत्रणा हवी तशी राबवता येते. निधी वाटपापासून अनेक गोष्टींमध्ये पालकमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यात जास्त आमदार असल्याने पालकमंत्रिपद दोन्ही काँग्रेसमध्येच कुणाला तरी मिळणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी या दोन पक्षांत काय निकष लागतो हे महत्त्वाचे आहे. मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यातील राजकीय सख्य पाहता ही जबाबदारी कुणालाही मिळाली तरी दोघांचाही व्यवहार पालकमंत्र्यांसारखाच राहणार, हे स्पष्टच आहे.------------------------------