कोल्हापूर : शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कोल्हापूरचे सुपुत्र आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे आले होते; पण बदललेल्या सत्तेच्या सारीपाटामुळे त्यांचे नाव मागे पडले असून, आता जयंत पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते; त्यामुळे अडीच वर्षे राष्टÑवादी व कॉँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळणार होते. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित होते; त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी अल्पसंख्याक समाजातील आमदाराला संधी द्यावी, असा एक मतप्रवाह दोन्ही कॉँग्रेसमधून पुढे आला होता. राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये नवाब मलिक व हसन मुश्रीफ हे दोन ज्येष्ठ आमदार आहेत. मुश्रीफ हे गेली २0 वर्षे अखंडितपणे निवडून आले असून, त्यातील १४ वर्षे मंत्री म्हणूनही कामाचा अनुभव आहे. त्यांनी देईल त्या मंत्रिपदाची जबाबदारी अतिशय नेटाने पार पाडत, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शरद पवार व एकूणच राष्टÑवादी कॉँग्रेसवर हल्ला करत असताना त्यांना कोल्हापुरातूनत्याच ताकदीने उत्तर देण्याचे काम हसन मुश्रीफ करत होते; त्यामुळे एकूणच शरद पवार यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून मुश्रीफ यांची राष्टÑवादीत ओळख आहे. त्यातूनच उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव पुढे आले होते.
यामुळे कोल्हापुरात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. विशेष म्हणजे या घडामोडींचे स्वागत सामान्य कष्टकरी लोकांमध्ये सुरू झाले होते. तोपर्यंत शनिवारी (दि. २३) सकाळी अनपेक्षितपणेघडामोडी घडल्या. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने सत्तेचा सारीपाटच बदलून गेला आणि मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री पदाची सुवर्णसंधी हुकली. तरीही शिवसेना, राष्टÑवादी व कॉँग्रेस यांचे सरकार आल्यानंतर मुश्रीफ यांना वजनदार मंत्रिपद मिळणार हे निश्चित आहे.