कोल्हापूर : गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत बुधवारी आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर दोन कोटींचा अब्रूनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर येत्या आठ दिवसांत, तर त्यानंतर संजय घाटगे यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह शिवसेना व भाजपच्या काळभैरी शेतकरी विकास पॅनेलची प्रचार समारोपाची जाहीर सभा २५ मार्चला गडहिंग्लजमध्ये झाली. त्यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील असे म्हणाले होते की, जिल्हा बँकेतील भ्रष्टाचारासंबंधीची केस उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २२ मार्चला तारीख होती. न्यायाधीश रजेवर गेल्याने ती तारीख एप्रिलमध्ये होत आहे. तिचा निकाल लागला असता तर मुश्रीफसाहेब, तुम्ही आता जेलमध्ये असता. कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही दिसला नसता.या वक्तव्यावरून मंत्री पाटील व मुश्रीफ यांच्यात बरेच दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुश्रीफ यांनी मला जेलमध्ये घालणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर दिले होते. दाव्याची धमकी ही तर मुश्रीफ यांचा स्टंट असल्याची टीका पालकमंत्री पाटील यांनी केली होती.कागल तालुक्यातील सावर्डे बुदु्रक व सावतवाडी गावाला पाणी पुरवठा योजनेचे कलशपूजन व्हनाळी येथे २२ एप्रिलला झाले. त्यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कर्जमाफीत जिल्हा बॅँकेत दीड हजार कोटी लाटल्याचा आरोप मुश्रीफांवर केला होता. या दोघांवरही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफांनी जाहीर केले होते.
चंद्रकांतदादांवर ठोकला मुश्रीफांनी दोन कोटींचा दावा
By admin | Published: April 28, 2016 12:01 AM