जहाँगीर शेख
कागल : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून नवीद मुश्रीफ आणि सत्ताधारी आघाडीतून विद्यमान संचालक अमरीश घाटगे हे विजयी झाले, तर रणजितसिंह पाटील आणि वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाला. यामुळे कागल तालुक्यात ‘थोड़ा गम, थोड़ी खुशी’ अशी स्थिती झाली आहे. गोकुळच्या सत्तेमुळे मुश्रीफ गटाची तालुक्याच्या राजकारणावरील पकड अधिकच मजबूत करणारा, तर संजय घाटगे गटाची ताकद शाबूत ठेवणारा हा निकाल आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफ, मंडलिक, संजय घाटगे गट यांचे समझोत्याचे राजकारण सुरू आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी संजय घाटगे या समझोता एक्स्प्रेसमधून बाजूला झाले; पण त्यांनी राजकीय वितुष्ट येऊ दिले नाही. उलट रणजितसिंह पाटील यांची अवस्था ‘एकाकी’ पडल्यासारखी झाली. समरजितसिंह घाटगे यांनी ताणाताणी केल्यानंतर सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला. मुळात कागल तालुक्यात मुश्रीफ गटाची ताकद जास्त आहे. आता गोकुळची नवी रसद मिळाल्याने हा गट अधिकच बलवान झाला आहे. गोकुळमधील सत्तांतराचे हे पडसाद आगामी निवडणुकांत उमटतील.
मुश्रीफ गटात हुरहुर आणि जल्लोष
मुश्रीफ यांनी तीन मुलांपैकी नवीद यांना सार्वजनिक जीवनात पुढे आणले आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत एकतर्फी वातावरण असतानाही अवघ्या सत्तेचाळीस मतांनी पराभव झाला होता. ही मोठी खंत मुश्रीफ गटास होती. गोकुळचा निकाल लांबत चालला तशी या गटाची हुरहुर वाढत चालली होती; पण मंत्री मुश्रीफ यांचे काम आणि नवीद यांनी जिल्ह्यातील ठरावधारकांच्या घरापर्यंत जाऊन साधलेला संवाद कामी आला. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
अमरीश आणि विजयी गुलाल
माजी आमदार संजय घाटगे यांचा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पराभव होत असताना त्यांचे पुत्र अंबरीश मात्र एकही निवडणूक हरलेले नाहीत. गोकुळच्या दोन निवडणुकांत प्रवाहाविरुद्ध ते निवडून आले आहेत. गेली तीस वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांचा पराभव ‘राजकीय पैरयाची’ किंमत स्पष्ट करणारा आहे. वीरेंद्र मंडलिकांचा पराभव मंडलिक गटाच्या जिव्हारी लागणारा आहे.
कागलची कन्या आणि जावई विजयी
शौमिका महाडिक या येथील ज्युनिअर घाटगे घराण्याच्या राजकन्या आहेत, तर नेर्लीचे प्रकाश पाटील हे कागलचे जावई आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव पाटील मळगेकर हे त्यांचे सासरे आहेत.