अनिल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कागल तालुक्यातील मुरगूड गट क्रमांक चारमध्ये मुश्रीफ-पाटील व मंडलिक गटामध्येच जोरदार धुमशान होणार हे निश्चित आहे.मुश्रीफ, के. पी. यांच्या आघाडीतून माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. विरोधी आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याच्यावर लढतीची धार अवलंबून आहे. जर भाजप शिवसेनेबरोबर राहिला तर मुरगूड गटातून ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे पाटील बंधूंच्यात ही लढतीची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. एकंदरीत मुरगूड परिसरात मुश्रीफ-पाटील, तर हमीदवाडा कारखान्याच्या परिसरात मंडलिक गटाची ताकद मोठी असल्याने तुल्यबळ लढती होणार हे नक्की.बिद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र जरी चार तालुक्यांमध्ये विखुरले असले तरी कारखाना कागल तालुक्यात असल्याने हा कारखाना तालुक्याच्या अन्य संस्थेची मातृसंस्था आहे. त्यामुळे बिद्री कारखान्यावर संचालक पद मिळवले की त्याचा अन्य राजकारणावर नक्कीच चांगला परिणाम होतो यासाठी उमेदवारी मिळणे महत्त्वपूर्ण ठरते. मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांची समझोता एक्स्प्रेस धावली होती, पण ‘बिद्री’मध्ये मात्र आपण एकमेकांच्या विरोधात असणार अशा प्रकारची सूचक कृती दिसत आहे. त्यामुळे मंडलिक-मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील द्वेषाची भावना कमी झाल्याचे दिसत आहे. मुश्रीफ गटाचे उमेदवार कोण असणार यावर लढतीतील रंगत अवलंबून आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, समरजितसिंह घाटगे व मुरगूडचे रणजितसिंह व प्रवीणसिंह हे सर्वजण एकत्र होते. मुरगूड गटातून महालक्ष्मी आघाडीमधून निवडणूक लढविणारे प्रवीणसिंह पाटील यांना २२0६0 मते, तर घाटगे गटाचे दत्तामामा खराडे यांना २२000 मते मिळाली होती. विरोधी मंडलिक संजय घाटगे गटाकडून राजर्षी शाहू आघाडीतून निवडणूक लढणारे सुखदेव येरुडकर यांना १६४५९ मते, तर चिखलीचे प्रवीण भोसले यांना १५३४१ मते पडली होती. यामध्ये पाटील आणि खराडे सरासरी सहा हजार मताधिक्यांनी विजयी झाले होते. यावेळी मात्र मुरगूडमधील मुश्रीफ यांच्याकडे असणारा जमादार गट विरोधी मंडलिक गटाला, तर संजय घाटगे गटाकडे असणारा चिखली मधील भोसले गट मुश्रीफ गटाला मिळाला. समरजितसिंह घाटगे गटाचा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे.
सध्या बलाबल जरी समसमान असले तरी माघारीच्या दिवसाअखेर काय घडामोडी घडतील याचा कोणालाही अंदाज नाही. बिद्री कारखान्यावर स्थापनेपासून बिद्रीच्या सत्तेत राहण्याची संधी पाटील घराण्याला मिळाली. त्यामुळे पाटील घराण्याला मानणारी सभासद संख्या नजरेत भरणारी आहे. शिवाय कारखान्यात गेली दहा वर्षे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असल्याने कारखान्याच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा सभासद वर्ग मोठा आहे. मुरगूडमध्ये विश्वनाथ पाटील यांच्यानंतर रणजितसिंह यांनी गोकुळ, तर प्रवीणसिंह यांनी बिद्री कारखान्यात राजकारण पहायचे असे जणू समीकरण बनले होते. बारीक सारीक निर्णय घेताना पाटील बंधू एकमेकांचा विचार घेत, पण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या दोन बंधूंच्यात दरी वाढली व दोघांनी राजकारणात वेगळे रस्ते धरले. अर्थातच भविष्यातील राजकारणामध्ये या दुहीचा विरोधकांना नक्कीच फायदा होणार आहे.
‘बिद्री’मध्ये हे बंधू एकमेकांसमोर येऊन लढावेत अशी ही परिस्थिती तयार केली जाऊ शकते. या गटातील मुश्रीफ आघाडीचा दुसरा उमेदवार ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हसन मुश्रीफ यांनाच आहे.या गटात सत्ताधारी गटाच्या विरोधात मंडलिक, संजय घाटगे गट सावध व्यूहरचना करताना दिसत आहे. वाढीव सभासद रद्द झालेला निर्णय थोडासा उभारी देऊन गेला आहे. शिवाय संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी मुरगूडमध्ये शिवसेनेच्या घेतलेल्या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले आहे.
शिवाय मागील निवडणुकीत सत्ताधारी गटातून ओबीसी प्रवर्गातून लढलेले राजेखान जमादार मंडलिक गटात आहेत. मंडलिक कारखाना कार्यक्षेत्रात काही गावांवर मंडलिक गटाचे प्राबल्य असल्याने या गटातूनही इच्छुकांची भाऊगर्दी आहे. अनेकांनी अर्ज दाखल केले असले तरी उमेदवारीची माळ संजय मंडलिक सांगतील त्यांच्याच गळ्यात पडणार हे नक्की. अर्थात वाढीव सभासद रद्द करण्याचा निर्णय जरी झाला असला तरी जे सभासद रद्द झालेत त्यांची संख्या मोठी असल्याने या गटाला यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.एकंदरीतच मुरगूड उत्पादन गटात चार उमेदवार एकमेकांसमोर येणार असून इतर गटामध्येसुद्धा मुरगूड गटातील काही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. युती काहीही होऊ दे, पण गटामध्ये जोरदार लढत दिसेल.मुरगूड गटातील गावेचिखली, खडकेवाडा, कौलगे, बस्तवडे, लिंगनूर, हमीदवाडा, सोनगे, कुरुकली, सुरूपली, यमगे, शिंदेवाडी, म्हाकवे, आणूर, बाणगे, मुरगुड शहर, चिमगाव, सेनापती कापशी, कासारी, गलगले, हळदवडे, करंजिवणे, हळदी, दौलतवाडी, बोळावी, ठाणेवाडी, मासा बेलेवाडी आणि का. बेलेवाडी, तर हणबरवाडी आणि रामपूर या गावात एकही सभासद नाही. अशा एकोणतीस गावांचा समावेश या गटात आहे.या गावांवर विशेष नजरमुरगूड (१0५७), यमगे (४१४), चिमगाव (४५३), बाणगे (५७४), म्हाकवे (४३९), कौलगे (४८६), कुरुकली (३१९) या गावांमध्ये इतर गावांच्या तुलनेने सभासद संख्या जास्त असल्याने उमेदवारांची या गावांवर विशेष नजर असणार आहे.आवेदन पत्र स्थितीया गटामध्ये ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. छाननीमध्ये यातील १२ अर्ज अवैध झाले असून, ४३ अर्ज शिल्लक राहिले आहेत.