नूल : गडहिंग्लज साखर कारखान्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे हात स्वच्छ नाहीत. चवली-पावलीला संचालक मंडळाला विकत घेऊन कारखाना जावयाच्या ब्रिस्क कंपनीच्या घशात घातला, असा सणसणीत टोला कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी हाणला.गडहिंग्लज साखर कारखाना बचाव जनजागरण मोहिमेअंतर्गत नूल येथे घेण्यात आलेल्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव शिंदे होते.डॉ. शहापूरकर म्हणाले, ज्या कंपनीचे भागभांडवल १० लाखांपेक्षा कमी आहे, अशा ब्रिस्क कंपनीला कारखाना चालवायला दिला. साडेतीन कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार करून शेतकऱ्यांची दौलत मुश्रीफांनी खिशात घातली. २०१० लाख २९ कोटी ४२ लाख रुपयांचा तोटा होता. मुश्रीफांनी ९९ कोटी ४२ लाख रुपयांना कारखाना तोट्यात आणला. राजकीय सत्तेचा गैरवापर करून संचालकांना नियम ७८ ची नोटीस बजावून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली आणि कारखाना गिळंकृत केला. नोटीस लागू केली, मात्र कारवाई त्यांनी का टाळली याचे उत्तर द्यावे. यावेळी आजरा कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल प्रा. सुनील शिंत्रे यांचा सत्कार झाला. यावेळी माजी सभापती आप्पासाहेब पाटील (औरनाळकर), उदय चव्हाण, प्रा. सुभाष शिरकोळे, मदन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बी. के. काळापगोळ, राजगोंडा पाटील, आणाप्पा चव्हाण, डॉ. स्वप्निल चव्हाण, अशोक बालेशगोळ, शंकरराव नंदनवाडे उपस्थित होते.
मुश्रीफांनी साखर कारखाना ‘ब्रिस्क’च्या घशात घातला
By admin | Published: October 04, 2015 11:21 PM