कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खास विमानाला हवामानाचा अडथळा आला. तरीही ते आंदोलनस्थळी पोहचलेच. दोन तासांनंतर पुन्हा त्या विमानाने ते मुंबईला रवाना झाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नियाेजित दौऱ्यानुसार ते बुधवारी सकाळी दहा वाजता आंदोलनस्थळी जाणार होते. त्यामुळे ते मुंबईहून सकाळी आठ वाजता कोल्हापूरला निघाले. मात्र मुंबईसह राज्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला. हवामान खराब असल्यामुळे विमानाला अडथळा निर्माण झाला. त्यातूनही वेळेत पोहचण्यासाठी बेळगाव येथे विमानाने येऊन तेथून मोटारीने कोल्हापुरात येणार होते. मुश्रीफ सुरुवातीला मुंबईवरून निघून बेळगावमध्ये विमानाने पोहोचणार होते. तिथून मोटारीने कोल्हापूरला येणार होते. साडेदहानंतर पाऊस थांबला आणि वातावरण स्वच्छ झाल्याने साडेअकरा वाजता ते विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर अभिवादन करून मंत्री मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडली.
उभ्याउभ्याच भाकरी आणि पिठलं खाऊन मुंबईला रवाना.....
मूक आंदोलनातून बाहेर पडताच मंत्री मुश्रीफ कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. बुधवारी मंत्री मंडळाची महत्त्वाची बैठक असल्याने त्यांना तातडीने मुंबईला जाणे गरजेचे असल्याने उभ्याउभ्याच भाकरी आणि पिठलं खाऊन ते सव्वाएक वाजता उजळाईवाडी विमानतळाकडे रवाना झाले. दुपारी दीड वाजता विमान मुंबईकडे झेपावले.