कोल्हापूर : ठाण्यातील एका प्रकरणात मी भाजप नेत्यांचे पाय धरल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला होता. पण, मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून खरे सांगा, मी कोणाचे पाय धरले? आई, वडील व शरद पवार यांच्याशिवाय आपण कोणाचेही पाय धरत नसल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला, याची सोमवारी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती.मंत्री हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दीक युद्ध ‘कोल्हापुरी चपलापर्यंत गेले. यावर न थांबता, कोणी-कोणी भाजप नेत्यांचे पाय धरले, असे आरोप-प्रत्यारोपही सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपावर बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी माझ्यावर टीका केली, मी टीकेला कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्याचे पाय धरले, हे तुम्हाला सांगणारा मूर्ख कोण आहे. तुम्ही ज्या जयंत पाटील यांचे नाव घेता, ते असे बोलणारच नाही. तुम्ही जयंत पाटील यांचे नाव घेत असाल तर त्यांनी तुम्हाला एका प्रकरणात मोठी मदत केली होती. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता, हे जरा जयंत पाटील यांना विचारा. ती मदत किती मोठी होती, त्याची कल्पना तुम्हालाही आहे.सगळे नेते बसलो त्यावेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे एका नेत्याने मला सांगितले. मात्र, मी येऊ शकत नाही, विचारधारा सोडू शकत नाही, तुम्हाला वाटले तर विधान परिषदेवर घ्या, असे मी म्हटलो होतो. कोणाच्या पाया पडलो नाही. त्यांनी कुराणावर हात ठेवून खरे बोलावे. आयुष्यभर खोटारडेपणा करणारे व रुग्णांच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? मुश्रीफ साहेब माझे तोंड उघडू नका, मी कमी बोलतो, लोकांमध्ये कमी मिसळतो, तेव्हा हात जोडून सांगतो, माझ्यावर टीका करू नका, नाहीतर यापेक्षाही विषारी टीका मी करू शकतो. माझी चूक नसताना कोणाच्या बापाचे ऐकत नाही. मरणापर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार, तुमच्या सारखे अर्धवट सोडून पळून जाणारा नाही. असेही आव्हाड यांनी म्हटले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून सांगा, मी कोणाचे पाय धरले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:25 PM