कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर शिंगे पकडणारच, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत केला.आरोपांबाबत आपण त्यांना माफी मागायला सांगितले होते, त्यांनी माफी राहू दे अनवधानाने वक्तव्य केले व सत्तेत असताना ईडी, आयकर मागे लावून दिलेला त्रास हा राजकीय हेतूने होता, असे कबूल केले तर हा वाद संपुष्टात येईल. त्यांनी प्रतिसाद दिला नाहीतर मग दावा दाखल करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाने ५ कोटी जनतेसाठी आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्यानंतर दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयांना खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
पंधराव्या वित्त आयोगातून ८० टक्के ग्रामपंचायतींना व प्रत्येकी १० टक्के जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी माझा सत्कार केला. त्यानंतर निधी वाटपाचा निर्णय तर केंद्र सरकारचा आहे, मग हसन मुश्रीफ हार कसे घालून घेतात? असे कुत्सित विधान पाटील यांनी केले.
या दोन्ही गोष्टींचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागण्यास आपण सांगितले होते, त्यावर पाटील यांचे उत्तर नाही. एक दिवस त्यांनी आपणास व सतेज पाटील यांना पत्र पाठवून कोरोनाकाळात किती मदत केली, याचे आत्मचिंतन करण्यास सांगितले.
यावर पाटील यांचे दोन चेहरे आहेत, एक चेहरा परोपकारी, प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे, असा भास व्हावा आणि दुसरा सत्ता संपत्तीच्या जोरावर विरोधकांना आयुष्यातून उठविण्याचा आहे. राज्य बँक व जिल्हा बँकेवर विभागीय सहनिबंधकांवर दबाव टाकून कलम ८८, पूर्वलक्षी प्रभावाने कारवाई करण्यास भाग पाडले.
न्यायालयात आरएसएसच्या वकिलांची फौज उभा केली. आता त्यांना विनंती आहे, त्यांनी गैरसमजुतीतून व अनावधानाने आरोप केले व ईडी, आयकरची कारवाई ही राजकीय हेतूने होती, हे कबूल करून वाद संपुष्टात आणावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांना क्लीनचिट मिळणारचंद्रकांत पाटील यांच्या निवडणूक शपथपत्रातील कारवाईत काहीही तथ्य नाही, त्या सरकारी कंपन्या आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्यांना आपण त्रास देत नाही. सत्ता ही लोककल्याणासाठी असते, त्यांनी त्रास दिला म्हणून आम्ही देणार नाही, त्यांनी निश्चिंत रहावे. असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे सोज्ज्वळ मुलगाआदित्य ठाकरे व आपला आठ महिन्यांचा संपर्क, मात्र ते सोज्ज्वळ मुलगा आहे. विनाकारण त्यांची बदनामी करण्याचे कटकारस्थान असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.सुशांतला मरणोत्तर भारतरत्नची मागणी होईलसंपूर्ण देश कोरोनाच्या संकटात होरपळत असताना, विरोधकांनी सुशांतसिंग राजपूतचा मुद्दा काढला. गांजा ओढणारा, महिलांशी संबंध असणाऱ्यांचे आपण किती उदात्तीकरण करायचे? उद्या, कदाचित त्याला मरणोत्तर भारतरत्नची मागणीही होऊ शकेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.