राम मगदूम।
गडहिंग्लज : प्रांत कचेरीची जागा महिन्यात पालिकेला परत मिळवून देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी डिसेंबरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली होती. परंतु, तीन महिने उलटले तरी त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे प्रांत कचेरीची जागा अद्याप महसूलच्याच ताब्यात असून, मुश्रीफांची घोषणा अजूनही हवेतच असल्याची चर्चा शहरवासीयांत आहे.
हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेल्या भागातील नागरी सुविधांसह गडहिंग्लजमधील विविध विकासकामांसाठी दहा कोटींचा निधी मुश्रीफांनी दिला. त्या कामांच्या शुभारंभप्रसंगीच त्यांनी प्रांतकचेरीची जागा पालिकेला महिन्यात परत मिळवून देण्याचे आणि जिल्हा नियोजन मंडळातून आणखी १० कोटींचा निधी देण्याचा शब्द गडहिंग्लजकरांना दिला होता. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. ६० वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी मागणीनुसार प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या वहिवाटीतील धर्मशाळेची इमारत खुल्या जागेसह महसूल खात्यांना भाड्याने दिली आहे.
नगरपालिकेने व्यापारी संकुल बांधण्यासाठी ती जागा शहर विकास आराखड्यात राखून ठेवली आहे. परंतु, २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यावेळच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रांतकचेरीची जागा बेकायदेशीरपणे महसूलच्या नावावर लावून घेतली. त्यावेळी मुश्रीफांच्या नेतृत्वाखालीच प्रांतकचेरीवर सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता.
दरम्यान, तत्कालीन महसूल व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ती’ जागा गडहिंग्लज पालिकेला कदापिही परत मिळणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांना एका बैठकीत बजावले होते. या पार्श्वभूमीवरच मुश्रीफांनी पालिकेच्या जागेवरील महसूलची घुसखोरी दूर करण्याचा ‘शब्द’ गडहिंग्लजकरांना दिला आहे.
---------------------------
* कुपेकरांच्यामुळे हे घडले
भडगाव रोडवरील जागा पालिकेने वीज मंडळाच्या कार्यालयासाठी भाड्याने दिली होती. त्यावर वीजमंडळानेही 'कूळ कायदा' लावला होता. परंतु, बाबासाहेब कुपेकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ती जागा पालिकेला परत मिळवून दिली. त्याठिकाणी दुकानगाळे व भाजी मंडई बांधण्यात आली आहे.
--------------------------
* मुश्रीफांनाही हे अशक्य नाही
मुश्रीफ हे राज्यातील वजनदार आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री आहेत. त्यांनी मनात आणले तर प्रांतकचेरीची जागादेखील पालिकेला नक्कीच मिळू शकते. त्या जागेसह सध्याचे न.पा.कार्यालय व वाचनालयाची जागा मिळून एकूण ही मोक्याची जागा तब्बल ४७ गुंठ्याची आहे. याठिकाणी सावंतवाडी व जळगाव नगरपालिकेच्या धर्तीवर बहुमजली व्यापारी संकुल बांधल्यास वर्षाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळून गडहिंग्लज पालिका स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
----------------------
फोटो ओळी : १९५९ मध्ये गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यांच्या सोयीकरिता प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेने महसूल खात्याला भाड्याने दिलेल्या धर्मशाळेच्या इमारतीसह याच जागेवर सरकारच्या महसूल विभागाने कूळ कायदा लावला आहे.
क्रमांक : २४०३२०२१-गड-०६