गडहिंग्लज : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या निवडणुकीत गडहिंग्लज पालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे. किंबहुना, त्यादृष्टीनेच त्यांची व्यूहरचना सुरू आहे. एका दिवसात तब्बल नऊ कोटींच्या विकासकामांचे नारळ फोडून शनिवारी (दि. ४) ते मिशन गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळही फोडणार आहेत. गेल्यावेळी गडहिंग्लज नगरपालिकेसाठी तत्कालीन सत्ताधारी जनता दल विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना युती अशी चुरशीची तिरंगी लढत झाली होती. परंतु, तिरंगी लढतीचा फायदा उठवून जनता दलाने थेट नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकून सत्ता अबाधित राखली. राष्ट्रवादीला पाच, तर भाजपला दोन व शिवसेनेला एक जागा मिळाली होती.
त्यावेळी राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजप-शिवसेना युतीने जनता दलाबरोबर आघाडी करून गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेतदेखील वाटा मिळविला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पाच वर्षे विरोधी बाकावरच बसावे लागले.
दरम्यान, गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या जनता दलाने विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना पाठबळ दिले. त्यानंतर हद्दवाढीमुळे अस्तित्वात आलेल्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या वाढीव प्रभाग ९ची निवडणूक ‘जनता दल व राष्ट्रवादी’ने एकत्र लढवली. परंतु, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या दोस्तीला तडा गेला. विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी गडहिंग्लज नगरपालिकेला साडेअकरा कोटींचा निधी दिला. त्यानंतर राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी दिला. त्यापाठोपाठ त्यांनी वाढीव हद्दीतील रस्ते व गटारी या मूलभूत सुविधांसाठी तब्बल नऊ कोटींचा निधी दिला आहे.
चौकट :
राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही..!
गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही मुश्रीफ यांनी शहरातील विकासकामांसाठी तब्बल साडेबावीस कोटींचा निधी देतानाच शहराच्या विकासाला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचा संदेशही दिला आहे. किंबहुना, राष्ट्रवादीच्या प्रचारातील हाच प्रमुख मुद्दा राहणार आहे.
चौकट :
त्याचे शल्य कायम..!
२०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत बाबासाहेब कुपेकर व मुश्रीफ यांनी जनता दलाकडून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली होती. परंतु, राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाचा फायदा उठवत सुंदराबाई बिलावर यांच्या पाठिंब्यावर जनता दलाने राष्ट्रवादीकडून पालिकेची सत्ता पुन्हा काढून घेतली होती. त्याचे शल्य मुश्रीफ यांच्या मनात कायम आहे.
‘महाविकास’ची मोट बांधणार?
कागल विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे नाही, याचीही खंत मुश्रीफ यांना आहे. त्यामुळे यावेळी गडहिंग्लज पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा त्यांचा पक्का निर्धार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तरी त्यातदेखील राष्ट्रवादीचाच प्रभाव राहणार आहे.