संगीत पंढरपूर हे महाराष्ट्र संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर झालेले आठवे नाटक. हे नाटक, बृहन्मुंबई महानगरपालीकेच्या प्रमुख कामगार अधिकारी वर्गाकडून सादर करण्यात आले. शैव आणि वैष्णव यांच्यातील द्वंद्व या नाटकात दाखवले आहे.‘लिंबराज’ हे या नाटकातील प्रमुख पात्र आहे. बाकीच्या भूमिका धरुन जवळजवळ २५ कलाकार नाटकात होते. पुरुष कलाकारांचा समावेश जास्त होता. नंदिनी नावाचे पात्र, एखादी स्त्री कलाकार नाटकात हवी म्हणून घेतल्याचे जाणवले. नाटकाचा विषय चांगला व वेगळा होता. सर्व कलाकारांनी अभिनयनसुद्धा चांगला केला. पण तरीही नाटक रंगले नाही. कथेची मांडणी, बांधणी कंटाळवाणी वाटली.उदय देसाई (लिंबराज) यांनी नाटकाचे संगीत दिग्दर्शन करुन स्वत: नाटकामध्ये भूमिका केली. तबला साथ अतूल ताडे यांनी केली. परंतु अरुण पुराणिक (आॅर्गन) आॅर्गन वाजवताना कसरत होत होती. बरेचसे स्वर त्यांना सापडत नव्हते. इतर तालवादकांनी चांगली साथ केली. लींबराज (उदय देसाई) यांनी पदे रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु त्यांचा आवाज काहीवेळा सुरांपासून वेगळा होत होता. नांदी व काहीच पदे चांगली रंगली. संजीव बर्वे (नारद) यांनीही काही पदे चांगली गायली. दोन गीते नृत्यासहित सादर झाली. त्या गाण्यांवर व नृत्यावर मेहनत घेतल्याचे जाणवले. नृत्यदिग्दर्शन उत्कृष्ट होते. बालकलाकार शर्वरी तळाशिलकर (माधवी) हिनेही आपली भूमिका चांगली निभावली.राजेंद्र पोतदार (विठ्ठल) यांनी चेहऱ्यावर कायम हास्य ठेवून विठ्ठल साकारला. संजय गडद ( कार्तिक स्वामी) यांनी दक्षिण भारतातील व्यक्तीमत्व चांगले रंगविले. भाषा, देहबोली यावरील त्यांचा अभ्यास चांगला वाटला.सुजाता धुतेनवरु (नंदिनी) यांची नाटकातील भूमिका फारशी महत्त्वाची वाटली नाही. एखादे कृ त्रीम आवाजात गायले जात होते. शब्द कळत नव्हते. इतर पात्रांनीसुद्धा आपापल्या भूमिका चांगल्या पार पाडल्या. नारदाची भूमिका अधिक मजेदार व्हायला हवी होती. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य सारे मन सुखावणारे होते.नाटकामध्ये नाटक रंगण्यासाठी कथानकाची दर्जेदार मांडणी असावी लागते. या नाटकामध्ये विषय चांगला असूनही कथानकाची मांडणी आकर्षक झाली नाही, असे वाटले व त्यामुळेच नाटक रंगले नाही. मात्र, स्पर्धेतील नाटक सादर करताना त्यात प्रयोगशीलता हवी, मात्र तीही पहायला मिळाली नसल्याने एकंदर नाटक रसिकांसाठी उदासिनच. संगीत पंढरपूर हे नाटक कथेच्या आघाडीवर अडखळले असले, तरी त्यातून महत्त्वाचे कथाभाग कंटाळवाणा वाटला. महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कलाकार असले पाहिजेत, मात्र त्यातही या नाटकाचे सादरीकरण करताना यश आले नाही. मात्र अशा सर्व आघाड्यांवर नाट्यकलावंतांनी आपला प्रभाव दाखवणे गरजेचे होते, मात्र, ते झाले नसल्याने नाटक रसिकांच्या दृष्टीने कंटाळवाणे झाले. स्पर्धेत उतरताना अशा मंडळांनी हे भान ठेवले पाहिजे.संध्या सुर्वे
संगीत पंढरपूर उदासिन
By admin | Published: January 27, 2015 9:53 PM