कोल्हापूर : एव्हरेस्ट शिखरावर ‘यास’ चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, मोठ्या प्रमाणात पडणारा बर्फ, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला कॅम्प दोनवर माघारी परतावे लागले. तिच्यासह ८० जणांचे पथकही वातावरण अनुकूल होण्याच्या प्रतीक्षेत आहे. चढाई केव्हा करायची याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासन व शेर्पा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी घेणार आहे.
एव्हरेस्ट मोहीम ही नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे. जास्तीत जास्त माेहिमा २० ते ३० मे यादरम्यान केल्या जातात. यंदासुद्धा २६ ते २८ मे ही वेदर विंडो चढाईसाठी पूरक होती. मात्र, प्रथम अरबी समुद्रातील ‘तौउते’ आणि दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये ‘यास’ वादळाने हवामानाचे सर्व अंदाज बदलून टाकले. अशा अटीतटीच्या वेळी वेगवान वारे आणि कल्पना करू न शकणारा वरून पडणारा बर्फ अशा वेळी एव्हरेस्ट चढाई करणे गिर्यारोहकांच्या जिवावर बेतणारे ठरू शकते. त्यामुळे २६ हजार फुटांवरील कॅम्प चारवर ऑक्सिजनविना मुक्काम करणे शक्य नाही. त्यामुळे कस्तुरीसह ८० जणांचे पथक आणि तितकेच मदत करणारे शेर्पा, असे १६० हून अधिक जण कॅम्प तीन आणि आता कॅम्प दोनवर आले आहेत. तेथेच बेस कॅम्पवरून खाण्याचे साहित्य हेलिकाॅप्टरद्वारे पोहोचविण्यात आले आहे. अशा खडतर आणि जोखमीच्या काळात गिर्यारोहकांच्या हाती केवळ प्रतीक्षा करणेच उरले आहे.
मोहिमेची मुदत वाढविली..
यात दिलासादायक बाब म्हणजे नेपाळ सरकारने यापूर्वी २९ तारीख खुंबूमधील रोप काढण्याची वेळ निश्चित केली होती. मात्र, त्यात बदल करीत ही मुदत ३१ मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे कस्तुरी ही मोहीम पूर्ण करून भारताचा तिरंगा लवकरच फडकवील, अशी आशा करवीरकरांना आहे.
कोट
विशेषत: २० ते ३० मे दरम्यान एव्हरेस्ट चढाईसाठी पोषक वातावरण असते. मात्र, प्रथम ‘तौउते’ आणि आता ‘यास’ चक्रीवादळ आले आहे. त्याचा परिणाम हिमालयीन महा लंगूरमध्ये दिसत आहे. पुन्हा चढाईसाठी वातावरण पोषक होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. एव्हरेस्टचा माथा गाठल्यानंतर तात्काळ मागेही तितक्याच वेगाने परतावे लागेल. त्याकरिता नियोजनही आवश्यक आहे.
- विनोद कांबोज,
प्रसिद्ध गिर्यारोहण तज्ज्ञ