इचलकरंजी : जमियत उलेमा हिंद व येथील मुस्लिम समाजाच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मोर्चामध्ये विविध घोषणांचे फलक घेऊन मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या कायद्याच्या आधारे भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच काळ्या फिती बांधून या विधेयकाचा निषेध नोंदविला.
इचलकरंजीतील चॉँदतारा (मर्कज) मस्जिद येथून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून मुख्य मार्गांवरून के. एल. मलाबादे चौकातून फिरून बंगला रोड मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी या कायद्याला आपला विरोध का आहे, याबाबत वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवासघाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, आदी उपस्थित होते.निवेदनात, धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरविण्याचा कायदा हा घटना पायदळी तुडविणारा आहे. यातून पुढे वर्णभेद व्यवस्था निर्माण होऊ शकते. अशा विविध कारणांमुळे या विधेयकाला विरोध आहे. देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता राष्टÑपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.मोर्चामध्ये मुसलमान बहाना है, संविधान निशाना है, नागरिकता संशोधन बिल नही चलेगा, संशोधन बिल के जरीये देश की संविधानपर हमला है, यह बिल एक षङ्यंत्र है, अशा घोषणांचे फलक घेऊन अनेकजण सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना ‘कॅब’बाबत निवेदनकोल्हापूर : संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (कॅब)ला मंजुरी देऊन भाजप सरकारने भारतीय राज्यघटनेतील सर्व जातिधर्मांच्या लोकांना एकत्रित ठेवण्याच्या उद्देशाला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, अशी मागणी गुरुवारी (दि. १२) आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.शिष्टमंडळात पश्चिम महाराष्टÑ युवा प्रवक्ता प्रा. शाहिद शेख, जिल्हा युवा अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष इम्रान सनदी, सुहेल शेख, तौफिक मुल्ला, तौसीफ मोमीन, विनोद बनगे, प्रवीण वाघमारे, फहीम वास्ता, सुमित माने, आदींचा यात समावेश होता.