इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा वारसा जपत कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी मराठ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून गावोगावांहून दसरा चौकात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याचे पाणी, जेवणाची सोय करतानाच मुस्लिम बोर्डिंग हे मराठा आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. मराठ्यांसाठी राबणाºया या मुस्लिम बांधवांनी जातिभेदांपलीकडे माणुसकीचे नाते कसे असते, याचा आदर्श घालून दिला आहे.मराठा आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या व्यासपीठामागेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेले मुस्लिम बोर्डिंग आहे. हे बोर्डिंग म्हणजे कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीचे एक केंद्र बनले आहे. रोज सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलनाला सुरुवात होते. रात्री दोन वाजेपर्यंत येथे कार्यकर्ते थांबून असतात. मराठ्यांच्या आरक्षणाच्या हक्कांसाठी लढणाºया कार्यकर्त्यांसाठी, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावांतून येणाºया नागरिकांसाठी, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी, पत्रकार तसेच नेत्यांसाठी मुस्लिम बोर्डिंगमध्ये जेवणाची सोय केली जात आहे. बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अशा रीतीने रोज दुपारी किमान चारशे व्यक्तींच्या व रात्री शंभर कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय येथे केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने दुपारचे जेवण पाठविले जात आहे.मुस्लिम बोर्डिंगमधील एक हॉल जेवणासाठी तर दुसरा हॉल नेत्यांच्या बैठका, पत्रकार परिषदा, चर्चा-विनिमयासाठी देण्यात आला आहे. पत आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, आदिल फरास, रफिक शेख हे कार्यकर्त्यांना व नेत्यांना काय हवं-नको याकडे जातीने लक्ष देत आहेत. रात्री उशिरापर्यंत ही सेवा दिली जाते. गतवर्षी १५ आॅक्टोबरला निघालेल्या मूक मोर्चाच्या वेळीदेखील मुस्लिम बोर्डिंग आणि बैतुलमाल कमिटीने मोर्चात सहभागी आंदोलकांसाठी जेवणाची व पाण्याची सोय केली होती.झाडलोटीपासून ते वाढप्यापर्यंतची कामेठिय्या आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी मुस्लिम बोर्डिंगचे शिपाई इलाई पठाणे हे ठिय्या आंदोलनाच्या परिसराची झाडलोट करतात. अब्दुल काझी, दिलावर देसाई, कादर जमादार, सादिक रंगरेज, अल्ताफ मुजावर हे जेवण वाढण्यापासून कार्यकर्त्यांना पाणी देण्यापर्यंतचे काम करतात.यांचे मोलाचे सहकार्यमहालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, क्रिडाई, वसीम चाबूकस्वार, मुल्लाणी ट्रेडर्स, जाकीर अथणीकर, फिरोज खान, आयेशा खान, संदीप नष्टे, जयेश कदम, अमित जाधव, विनायक सूर्यवंशी अशा अनेक व्यक्तींनी या सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
मराठ्यांच्या लढाईत मुस्लिमांचा खांद्याला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:56 AM