गणपती कोळी -- कुरुंदवाड -शहरात मुस्लिम मतदार दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा निर्णायक मतदार असून या समाजाचे जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये चांगले स्थान दिले आहे. त्यामुळे या मतासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे.कोणत्याही निवडणुकीत पक्ष उमेदवारी देताना त्याचे शिक्षण, कार्य, जनसंपर्क यापेक्षा आर्थिक कुवत व जात पाहिली जाते. ज्या-त्या प्रभागात शहरात ज्या समाजाचे वर्चस्व असते, त्या समाजाची मते मिळविण्यासाठी उमेदवारी दिली जाते. मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाचे शहरात सुमारे ४५०० मतदार असून, प्रभाग ५ व ६ मध्ये निर्णायक मतदार आहेत. तसेच इतर सर्वच प्रभागांत दखल घेण्याइतपत मतदार आहेत. हा मतदार कोणत्या पक्षाकडे वळतो, तो पक्ष विजयश्री खेचण्यात यशस्वी होत असतो. त्यामुळे या समाजाची मते खेचण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच असून पक्षांनी उमेदवारीमध्ये या समाजाला झुकते माप दिले आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग ४, ५ व ६ मध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीने नरगीस गौसमहंमद बारगीर, फारुक मौला जमादार, रजियाबेगम नासिरखान पठाण, मुमताज मुस्ताक बागवान, इसाक सैफुद्दीन मोमीन अशी सर्वाधिक पाच उमेदवारी दिली आहे.भाजपने नूरजहाँ सलीम सुतार, दस्तगीर अहमद फकीर (शिवशाही), खुशनजर हरुण पटवेगार (शिवशाही) असे तीन उमेदवार, तर काँग्रेसनेही लियाकत सरदार बागवान, सिमरन शकील गरगरे व मुमताज इसाक बागवान असे तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या माध्यमातून समाजाची मते आपल्याच पक्षाच्या पारड्यात टाकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.एमआयएम प्रथमच निवडणुकीतयेथील नगरपालिका निवडणुकीत एमआयएम प्रथमच उतरली असून, दलित समाजाचे कार्यकर्ते सुनील कुरुंदवाड यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, तर प्रभाग ६ मधून तौसिफ यासीन चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एमआयएमची उमेदवारी सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे.
मुस्लिम मतदार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 12:21 AM