कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने नवीन मतदार नोंदणी करतेवेळी अल्पसंख्याक (मु्स्लीम) यांची नोंदणी करू नये, असा ठराव केल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता; पण ही चूक लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने मुस्लीम नव्हे, तर बांगलादेशी अल्पसंख्याकांची नोंदणी करू नये, असे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागितला आहे.मे महिन्यात नागदेवाडी (ता. करवीर) येथील एका कॉलनीत बनावट आधार कार्ड बनवून राहत असलेल्या बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली होती. यावर, २८ ऑगस्टला झालेल्या शिंगणापूर गावसभेत चर्चा होऊन सतर्कता बाळगण्याची सूचना ग्रामस्थांनी दिली होती. हा ठराव करताना बांगलादेशी असे म्हणण्याऐवजी अल्पसंख्याक मुस्लीम असा शब्द वापरला होता. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. याबाबत, सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताही उद्देश ग्रामपंचायतीचा नाही. अनवधानाने बांगलादेशी मुस्लीमऐवजी मुस्लीम हा शब्द पडल्याचे सांगितले.जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नगावसभा होऊन वीस दिवस झाले, मग आता ही ठरावाची प्रत कोणी व्हायरल केली. यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
नागदेववाडी कॉलनीत बनावट आधार कार्ड बनवून दोन बांगलादेशी मुस्लीम महिला राहत होत्या. असा प्रकार आमच्या कॉलनीत होऊ नये यासाठी गावसभेत चर्चा होऊन ठराव झाला; पण यात बांगलादेशी मुस्लीम हा शब्द अनवधानाने नमूद करण्याचे राहिले. स्थानिक मुस्लीम समाजाला नियमानुसार मतदार नोंदणी करण्यास कोणाचीही हरकत नाही. - रसिका पाटील (सरपंच, शिंगणापूर)मुस्लीम नव मतदार नोंदणीबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव पंचायत समितीकडे प्राप्त नाही. तरीही व्हायरल पत्राबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता अनवधानाने बांगलादेशी मुस्लीम शब्द राहून गेल्याचा तोंडी खुलासा दिला आहे; पण याबाबत लेखी खुलासा देण्याचे आदेश दिले. - विजय यादव (गटविकास अधिकारी, करवीर)