कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकीलबांधवांनी शुक्रवारी तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे मूक आंदोलन झाले.गेल्या तीन दशकांपासून सर्किट बेंच मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील सर्व वकीलबांधव आंदोलन करत आहेत. शुक्रवारी कोल्हापुरातील टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते एकत्र जमले. त्यानंतर मूक आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी वकिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून प्रशासनाचा निषेध केला. दुपारी दोन वाजेपर्यंत वकीलबांधवांचे आंदोलन सुरू होते. दरम्यान, त्याचाच एक भाग म्हणून सर्व तालुका न्यायालयाच्या आवारात एकाचवेळी अशाप्रकारचे आंदोलन झाले. या मूक आंदोलनात अॅड. डी. डी. घाटगे, अॅड. राजेंद्र वायंगणकर, अॅड. अशोक पाटील, अॅड. श्रेणिक पाटील, अॅड. पी. आर. बाणावलीकर, अॅड. कोमल राणे, अॅड. संपत पवार, अॅड. एस. बी. पाटील यांच्यासह सुमारे दोनशे वकिलांचा सहभाग होता.
वकिलांचे मूक आंदोलन
By admin | Published: April 18, 2015 12:17 AM