* औरवाड, गौरवाडमधील प्रकार
बुबनाळ : श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या मालकीच्या औरवाड व गौरवाड मधील १२०० एकर जमीन पाळीदार एकरी २५ लाख तर गुंठा अडीच लाख या दरांनी विक्री केल्या आहेत. या बेकायदेशीर जमिनी खरेदीची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या गौरवाड व औरवाड येथील जमिनीवर पोकळ नोंदी असलेल्या काही पाळीदारांनी गुंठेवारी प्लॉट पाडून जमिनीची विक्री केली आहे तर काही पाळीदारांनी एकरी जमिनी विकल्या आहेत. दत्त देवस्थानच्या इनामी १२०० एकरमधील शेकडो एकर जमिनी बेकायदेशीर विकल्या जात आहेत. यापूर्वी दत्त देवस्थानचे विश्वस्त मंडळाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे जमिनीचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे किसान मोर्चाचे सदस्य अन्वर जमादार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोट - शिरोळ तालुक्यातील गौरवाड व औरवाडमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानच्या १२०० एकर जमीन आहे. मात्र, या जमिनी परस्पर बेकायदेशीर विक्री केल्या जात आहेत. शासननिर्णयानुसार सातबारावर ‘देवस्थान’चे नाव कायम ठेवून १९२७-२८ सालच्या पाळीदारांचे नाव रद्द व्हावे व बेकायदेशीर खरेदीची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- अन्वर जमादार
कोट - औरवाड, गौरवाडच्या इनामी जमिनीवर श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानची मालकी असून त्या कोणीही परस्पर विक्री करू नये.
- अशोक पुजारी, विश्वस्त, श्री दत्त देवस्थान