कोल्हापूर : ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले असले तरी माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच माझे स्वप्न असून, तुमच्या सर्वांच्या साथीने हे पदक मी जिंकणारच, असा शब्द ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने बुधवारी ऐतिहासिक दसरा चाैकात कोल्हापुरवासियांना दिला.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक मिळाल्याबद्दल प्रथमच ते कोल्हापुरात आले. त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे भव्य सत्कार झाला. ताराराणी चौकातून भव्य मिरवणुकीने दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राजर्षी शाहू स्मारक भवनात स्वप्नीलने पत्रकारांशी संवाद साधला.कोल्हापूर खरोखरच क्रीडानगरी आहे. कोल्हापूरकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे, त्यांच्या पाठिंब्यामुळे आणखी प्रेरणा मिळाली आहे, असे सांगून स्वप्नील म्हणाला, हे एक माझ्या एकटयाचे यश नाही. ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी सर्वच घटकांनी मला मोलाची मदत केली. प्रेरणा, ताकद दिली. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो. सातव्या क्रमांकापासून ते तिसऱ्या क्रमाकांपर्यंत येईपर्यंत मनाची खूप धाकधूक होती. मात्र खेळात घाबरुन चालत नाही. हृदयाचे ठोकेही वाढवून चालत नाही. खेळात कसे शांत राहयचे, कसे खेळायचे हे मी माझ्या वरिष्ठांकडून शिकलो. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा झाला. पत्रकार परिषदेला स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे, भाऊ सूरज कुसाळे, प्रशिक्षक दीपाली देशपांडे, अक्षय अष्टपुत्रे, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.
स्वप्नील शिस्तप्रिय खेळाडूप्रशिक्षक दीपाली देशपांडे म्हणाल्या, स्वप्नील शिस्तप्रिय खेळाडू आहे. पहाटे साडेपाच वाजता प्रशिक्षणासाठी हजर राहायचा. ध्येयासाठी तो कधीही बाजूला गेला नाही. त्याने एक वर्ष आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले. फक्त ज्युनिअर प्रशिक्षण कालावधीत खेळाडूंचा सामना दुपारी होता. त्या वेळी आमची प्रशिक्षणार्थी खेळाडू सकाळी झोपली होती. नेमबाजीत अति झोप चालत नाही. त्याचा खेळावर परिणाम होतो. त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत स्वप्नीलला ओरडण्याची एकदाच वेळ आली.