कोल्हापूर : सासुरवाशीण मुलीसाठी माहेर म्हणजे मनाचा हळवा कोपरा, वर्षातून एक-दोनदा माहेरची वारी झाली की नवी उमेद मिळते, आईने लेक-नातवंडांसाठी केलेला प्रेमाचा घास, सासर-माहेरचे हितगुज, काही दिवस मिळणारा निवांतपणा, जिवाभावाच्या माणसांचा सहवास सासुरवाशिणींचे हे सगळं सुख गेल्या वर्षभरापासून कोरोनाने अक्षरश: हिरावून घेतले आहे. भेटीची आस ठेवून व्हिडिओे कॉलद्वारे होणारा व्हर्च्युअल संवाद तासन्तास झाला तरी त्याला प्रत्यक्ष भेटीची सर कधीच येत नाही..
सासरच्या दारातलं माप ओलांडल्यावर मुलगी माहेरच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. सासरी सुखासीन आयुष्य असलं तरी प्रत्येक सासुरवाशिणीसाठी तिच्या माहेरची झोपडीदेखील महालापेक्षा कमी नसते. उन्हाळा आणि दिवाळी या दोन वर्षांतील सर्वात मोठ्या सुट्यांच्या काळात जवळपास सर्वच विवाहित मुली आपल्या मुलांना घेऊन माहेरी जातात, आई-आजीच्या प्रेमाचा वर्षाव, मायेने होणारी विचारपूस, मामाकडून भाच्यांचे होणारे लाड, गावाकडचं जगणं, फिरणं, मौजमजा, मस्ती आणि धम्माल, भावजयीकडे वेगवेगळ्या पदार्थांची फर्माईश, सुख-दु:खाच्या चार गोष्टी या आनंदापुढे जगभरातील पर्यटनही फिके पडते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाला आणि ऐन उन्हाळ्यात सगळ्यांना बंदिस्त राहावं लागलं. एक वर्ष असंच घालवल्यानंतर वाटलं की, यावर्षी तरी उन्हाळ्यात नक्की माहेरी जाता येईल, पण आताही दुसऱ्या लाटेमुळे मामाचं गाव मुलांसाठी दूरच राहिले आहे.
---
माझं माहेर माहेर...
उन्हाळा आणि दिवाळी असं वर्षातून दोनदा मी भंडीशेगाव (पंढरपूर) माहेरी जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून रेल्वे बंद आहे, मुलं लहान आहेत, दीड वर्ष झालं कितीही आठवण आली तर आईला, माहेरच्या माणसांना भेटता आलेलं नाही.
प्रियांका कोळी
--
माझं माहेर नणदी (ता. चिक्कोडी) इथलं. चैत्र पौर्णिमेला तिथे मोठी यात्रा असते तेव्हा मी मुलांना घेऊन माहेरी जाते, ते अक्षय्यतृतीया करूनच परत येते. सलग दुसऱ्या वर्षी मला माहेरी जाता आलेलं नाही. कधी एकदा हे सगळं संपेल आणि माहेरी जाता येईल, असं झालंय.
मधुबाला आडनाईक
---
पुण्यात कोरोनाचा संसर्ग खूपच आहे, कितीही आठवण आली तरी माहेरी जाता येत नाही. अनेकदा तर आहे तशी बॅग भरून जावं, अशी इच्छा होते; पण आई-वडील वयस्कर आहेत. कोरोना कमी व्हायची वाट बघण्याशिवाय पर्यायच नाही.
पूनम रजपूत
---
लागली लेकीची ओढ..
मुलगी बदलापूरला राहते. गेल्यावर्षी कोरोना कमी झाल्यावर आले होते, त्यावर परत भेट झाली नाही. रोज सकाळ-संध्याकाळ फोनवरच बोलणं होतंय. लांबनं कितीबी फोनवर बोललं तरी भेटल्यावानी वाटत नाहीच.
मालती भालेकर
---
मुलगी पुण्यात राहते, वर्षभरापासून ती कोल्हापूरला आलेलीच नाही. आता सुटीला येणार होती, तोपर्यंत परत कोरोना सुरू झाला. एक तर वर्षातनं एकदा भेटायला मिळतंय, तर ते पण आता बंद झालं.
सुवर्णा कोळी
--
मुलगी दरवर्षी डिसेंबर आणि उन्हाळ्यात येते. यावर्षी आलेलीच नाही. नातवंडं आठवण काढतात. व्हिडिओ कॉलवर बोलणं होतंय. आता दिवाळीत कोरोना कमी झाला तरच आमची भेट होणार.
सुनीता पोतदार
--
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार?
कोरोनामुळं खेळणं बंद, टीव्ही तरी किती बघायचा. मामाच्या गावाकडं शेतात फिरणं, विहिरीत पोहणं, झाडावर चढून आंबे काढणं अशी धम्माल असते. सगळं कसं आठवतंय, कधी एकदा कोरोना संपतोय, कधी एकदा देववाडीला जातोय, असं झालंय..
यश पोवार
--
सोलापूरला आजी-मावशीकडे गेले की, पंधरा दिवस आमची धम्माल असते. आम्ही सगळे बहीण-भाऊ मिळून मज्जा करतो. रोज चमचमीत पदार्थांची मेजवानी असते. बाग - चित्रपट बघायला जाणं, पर्यटनाला जाणं, सगळंच मी खूप मिस्स करतेय. घरी बसून कंटाळा आलाय. कोरोना जरा कमी झाला की, मी आधी आजीकडे जाणार आहे.
ऋतुजा सूर्यवंशी
--
माझं आजोळ खूप लांब नांदेडमध्ये आहे. तिथे मी सुटीत महिनाभर राहते, मस्त फिरायला जाते. आंबे खाते, सगळ्यांसोबत एकदम मज्जा येते. आता कोरोनामुळे जायला मिळालं नाही म्हणून तुम्हीच या, असं मी सगळ्यांना सांगते पण त्यांनाही येता येईना.
अनन्या मनाठकर
---
डमी स्वतंत्र