लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरात सुरू असलेल्या दारू दुकानदारांकडून मी दोन कोटी रुपये घेतल्याचा काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी मंगळवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत केला आहे. आरोप करणाऱ्यांनी नुसते आरोप करून न थांबता माझी नार्को टेस्ट करावी, त्यास माझी तयारी आहे, असे आव्हान माजी महापौर सुनील कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करताना ‘कारभारी नगरसेवकां’कडून दोन कोटींची सुपारी फुटल्याचा आरोप मी केला होता. त्यांचे बिंग फुटल्याने त्यांनी माझ्यावर आरोप केला. पैसे घेतलेत की नाही हे तपासण्यासाठी नार्को टेस्ट करण्यास माझी तयारी आहे. माझे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासा. मी कोणाशी बोललो, कोणाचे फोन मला आले याची माहिती काढा आणि आरोप सिद्ध करावा, असे आव्हानच कदम यांनी दिले. मी व्यक्तिश: तसेच आमची भाजप-ताराराणी आघाडी दारूबंदीच्या आजही विरोधात आहे. दारूबंदी संपूर्ण शहरात करा अशी आमची मागणी आहे. महापौरांनी तशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे सांगून सुनील कदम म्हणाले की, १ एप्रिलपासून राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटर अंतरातील जी दारू दुकाने बंद झाली, त्यापैकी काही दुकानदारांनी आपली दुकाने स्थलांतर करून नवीन जागेत सुरू केली आहेत. या दुकानांना प्रशासनाने कशी परवानगी दिली याची आयुक्तांनी तपासणी करावी. ज्या इमारतींना बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र मिळालेले नाही, ज्या दुकानांना परवाना विभागाकडून परवाने दिलेले नाहीत तरीही ती सुरू झाली आहेत. ती तत्काळ बंद करावीत. जी दुकाने विनापरवाना आहेत, त्यांना नोटीस का आणि कोणी दिली याचीही चौकशी करून आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी.
माझी नार्को टेस्टचीही तयारी
By admin | Published: June 23, 2017 12:48 AM