कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी आहेत, तर शिक्षक नाहीत; मैदान आहे, तर खेळाचे साहित्य नाही. प्रशस्त इमारत आहे, तर स्वच्छ शौचालयाची सोय नाही. झोपडपट्टी भागातील शाळा, तर रात्री तळीरामांचा अड्डाच बनल्या. अशाही विपरित परिस्थितीत शहरात ज्या काही महापालिकेच्या मोजक्या शाळा गुणवत्तेच्या जोरावर तग धरून आहेत, त्यामध्ये सुभाषनगर विद्यालयाने जोरदार मुसंडी मारत शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळा पसिररात २२५ हून अधिक झाडे जगवून ‘माझी शाळा... हिरवी शाळा’ ही संकल्पना सत्यात उतरविली आहे.खासगी शाळांच्या स्पर्धेत गेल्या काही कालावधीत महापालिकेच्या शाळांची स्थिती दयनीय झाली आहे. याउलट जरगनगरसह शहरातील काही मोजक्या उत्कृष्ट महापालिकेच्या शाळांच्या पंगतीत बसण्याचा मान सुभाषनगर शाळेने विविध उपक्रम राबवित मिळविला आहे. शिक्षकांच्या मदतीने स्थानिक नगरसेवक सतीश घोरपडे यांनी या शाळा सुधारण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न व त्यांना पालकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शाळेचा कायापालट झाला. शाळेकडे मुलांची ओढ वाढावी यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढ होण्यासाठी दररोज वाद्यवृंदासह परिपाठामध्येप्रार्थनेसोबत पाढे, सामान्य ज्ञानाची माहिती दररोज दिली जाते. अप्रगत मुलांसाठी दररोज शाळेत १० ते ११ या वेळेत जादा तास होतात. परिणामी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत झपाट्याने वाढ होत आहे. शाळेचा परिसर फळाफुलांनी, वनौषधींनी बहरला आहे. वर्गात फुलांचे चित्र, विरुद्धार्थी शब्द लावले आहेत. बैठक व्यवस्था आकर्षक पद्धतीने केली आहे. लोकवर्गणीतून दीड लाख रुपये खर्चून शाळेत ‘चिल्ड्रन पार्क’ उभारला आहे. यासह मैदान सपाटीकरण करून, शाळेभोवती संरक्षक भिंत उभारली. अशा विविध उपक्रमांद्वारे बंद पडण्याच्या स्थितीतून शाळा व्यवस्थापनाला दरवर्षी शाळेची पटसंख्या वाढविण्यात यश येत आहे.परिसरात बहुसंख्य कष्टकरी पालक आहेत. परिणामी पाल्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. शैक्षणिक महत्त्व रुजविण्यासाठी रात्रशाळा ही संकल्पना सुरू केली. लोकसहभागातून शाळेची भौतिक परिस्थिती सुधारली. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने पटसंख्या २०४ पर्यंत पोहोचली. खासदार निधीतून शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प आहे. - सतीश घोरपडे, नगरसेवक शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन, मीनाराज मंच, पालक सभा, क्रीडामहोत्सव, अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. उत्कृष्ट पोषण आहार, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. अशा या सुभाषनगर विद्यालयाचे ‘संत रोहिदास विद्यामंदिर’ असे नामकरण अगज, गुरुवारी होत आहे.ननामकरण सोहळाया सुभाषनगर विद्यालयाचे ‘संत रोहिदास विद्यामंदिर’ असे नामकरण उद्या, गुरुवारी होणार आहे. या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमोल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, महापौर तृप्ती माळवी उपस्थित राहणार आहेत.
माझी शाळा हिरवी शाळा...
By admin | Published: March 25, 2015 11:50 PM